पिंपरी : प्रवाशांची संख्या वाढल्याने रेल्वेमध्ये गर्दी होत आहे. यात जागेसाठी वाद होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सिंहगड एक्सप्रेसमध्ये बुधवारी सकाळी अशाच प्रकारे वाद होऊन हाणामारी झाली. मात्र, काही प्रवाशांनी मध्यस्थी करून वाद मिटविला.
मध्यस्थी करून वाद मिटवला-
पुणे येथून निघणारी सिंहगड एक्सप्रेस सकाळी ६.४० वाजता चिंचवड येथे आली. त्यानंतर मोठी गर्दी झाल्याने प्रवाशांची धावपळ सुरू झाली. गाडीत जागा मिळावी म्हणून गलका झाला. यात काही प्रवाशांमध्ये बाचाबाची होऊन धावत्या गाडीतच हाणामारी सुरू झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मात्र दररोज प्रवास करणाऱ्या काही चाकरमान्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना या गाडीने प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी-
सिंहगड एक्सप्रेसने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे ही गाडी दररोज 'फुल्ल' असते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत असतात. तसेच प्रत्येक स्टेशनवर गाडीत जाण्यासाठी व उतरण्यासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
पिंपरी- चिंचवडसाठी स्वतंत्र बोगीची मागणी-
उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातून मुंबईला ये- जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यात दीड ते दोन हजार चाकरमाने आहेत. पिंपरी येथून व्यावसायिक व व्यापारी मोठ्या संख्येने मुंबईला ये-जा करतात. चिंचवड येथून विद्यार्थी तसेच एमआयडीसीतील कामगार व इतर चाकरमाने मुंबईकडे जातात. त्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरासाठी या गाडीला आणखी स्वतंत्र बोगी वाढविण्यात याव्यात, अशी मागणी पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाकडून सातत्याने करण्यात आली आहे. याबाबत रेल्वेचे संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडेही निवेदन देण्यात आले आहे. बोगी उपलब्ध झाल्यास प्रवाशांची गैरसोय टाळण्यास मदत होईल, असे प्रवासी संघाचे अध्यक्ष इकबाल मुलाणी यांनी सांगितले.