पिंपरी : पत्र्याची मोठमोठी गोदामे, त्यात भंगार साहित्याचे ढिगारे, प्लास्टिकपासून रबरापर्यंत आणि लोखंडी यंत्रांपासून ऑईल-रंगांच्या डब्यांपर्यंत सगळे भंगार रचून ठेवलेले... दाटीवाटीने वसलेल्या दुमजली-तीनमजली पत्र्याच्या खोल्या... बहुतांश गोदामे अनधिकृतच. चिखलीच्या कुदळवाडी परिसरातील हे चित्र. हजारो कुटुंबांना जगवणारा हा परिसर सोमवारी लागलेल्या आगीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्यावर्षी कुदळवाडीमध्ये तब्बल ५८ आगीच्या घटना घडल्या.
शहरातील चिखली, महादेवनगर, कुदळवाडी, पवारवस्ती, बालघरेवस्ती, जाधववाडी आणि मोशीरोड परिसरात तीन हजारावर भंगार गोदामे आहेत. १९९७ पासून या परिसरात पत्र्याचे शेड मारून गोदामे उभारण्यास सुरुवात झाली. बघता-बघता संख्या वाढत गेली. या गोदामांमध्ये भोसरी, चाकण एमआयडीसीतील कंपन्यांचे भंगार, खराब उत्पादन आणि लगतच्या परिसरातून जमा केलेले भंगार साहित्य ठेवले जाते. यामध्ये स्क्रूपासून इंजिनपर्यंत, जुन्या रेडिओपासून ते वॉशिंग मशीनपर्यंत, कपडे, जुने फर्निचर, संगणक साहित्य, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक साहित्य, वाहनांचे सुटे भाग, प्लास्टिकपासून रबरापर्यंत आणि यंत्रांपासून ऑईल-रंगांच्या डब्यांपर्यंत सगळ्या भंगार साहित्याचा समावेश आहे. काहींवर प्रक्रिया करून किंवा दुरुस्ती करून पुन्हा विक्रीसाठी पाठविले जाते किंवा तेथेच विकले जाते.
पत्र्याची दुमजली, तीनमजली घरे
साहित्य विलगीकरण, मालाची प्रतवारी, मालाची चढउतार, भंगार वस्तू गोळा करणे अशी विविध काम करणारे २५ हजारांहून अधिक कामगार येथे काम करतात. त्यातील बहुतांश उत्तरप्रेदश, बिहार, दिल्ली या उत्तरेकडील राज्यांतून रोजगारासाठी आलेले. भंगार व्यवसायावर पाच ते सहा हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. काही कामगार गोदामांमध्येच राहतात, तर काही कामगार गोदामांजवळच १० बाय १२ च्या लोखंडी पत्र्याच्या दुमजली-तीनमजली घरांमध्ये राहतात. त्यांच्यासाठी सार्वजनिक शौचालय, घरात किंवा बाहेर सार्वजनिक पाण्याचा नळ, वीज सुविधा आहे.
रस्ते अरूद... बोळकांडेच जणू!
भंगार गोदामांमध्ये कच्च्या मालाची ने-आण करण्यासाठी छोट्या मालवाहतूक वाहनांचा वापर होतो. मात्र, एकाचवेळी एक चारचाकी वाहन जाईल इतके अरुंद रस्ते. आग लागली तर अग्निशमन विभागाची गाडी जाण्यासाठी जागाच नाही.
कुदळवाडीतील आगीच्या घटना
२०२० - ३०२०२१ - ४१२०२२ - ४४२०२३ - ५८२०२४ (ऑक्टोबरपर्यंत) - ४४