वाकड : सुरक्षारक्षकाने चाणाक्ष नजर, चपळपणा आणि स्मार्ट वर्क करीत थोडे सजग राहिल्यास अनेक गुन्ह्यांना प्रतिबंध बसेल तसेच मी जरी पोलीस म्हणून समाजाची रक्षा करीत असले तरी माझ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी मला सुरक्षा रक्षकांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे प्रत्येकजण कुठे ना कुठे सुरक्षा रक्षकांमुळे सुरक्षित असल्याने सुरक्षा रक्षक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी ताथवडे येथे केले. वाकडपोलिस ठाण्याच्या वतीने निवासी सोसायटी-कंपनी मधील खाजगी सुरक्षा रक्षक यांच्यासाठी मालमत्ता सुरक्षा, आग, लिफ्ट अपघात प्रसंगी तातडीने करावयाच्या उपाय योजनांबाबत सोमवारी (दि. १) येथील बालाजी सोसायटीत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या शिबिराला सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन, अग्निशमन विभागाचे ऋषिकांत चिपाडे, बिजू पिल्ले, प्रमुख वक्ते व गुन्हे प्रतिबंध तज्ञ् शरद श्रीवास्तव, ओटीजचे रॉनी चौधरी, संतोष शर्मा, सुदेश राजे, अरुण देशमुख, किरण वडगामा, शिवाजी कटके, बाळासाहेब कलाटे, यांच्यासह वाकड व हिंजवडी परिसरातील सोसायटीचे चेरमन -सेक्रेटरी आणि विविध एजन्सीत काम करणारे सुमारे चारशे सुरक्षा रक्षक उपस्थित होते. पाटील म्हणाल्या, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सुरक्षा रक्षकांना आपली खाजगी आणि व्यक्तिगत कामे सांगू नये. त्याला स्वाभिमानाची चांगली वागणूक द्यावी. या शिबिरात पुढील तज्ञांनी मार्गदशन केले. शरद श्रीवास्तव यांनी आधुनिक सुरक्षा व्यवस्था तसेच गुन्हे घडू नये यासाठी घ्यावयाची खबरदारी व सुरक्षा रक्षक व एजन्सी यांच्याबाबत नियम कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन केले, ऋषिकांत चिपाडे यांनी आग लागल्यांनंतर सुरक्षारक्षक म्हणून करावयाची कृती व जबाबदारी तसेच त्यांचे याबाबत अज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले रॉनी चौधरी यांनी लिफ्टमध्ये होणारे अपघात व त्याबाबत घ्यावायची काळजी, यांच्यासह झवर यांनी सीसी टीव्हीचे कंट्रोलिंग आणि डाटा सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले.
सुरक्षारक्षक समाजाचा अविभाज्य घटक : नम्रता पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 3:02 PM
मी जरी पोलीस म्हणून समाजाची रक्षण करत असले तरी माझ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी मला सुरक्षा रक्षकांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे....
ठळक मुद्देताथवडे : वाकड पोलीस आयोजित सुरक्षारक्षकांसाठी मार्गदर्शन शिबीर सुरक्षा रक्षकांना स्वाभिमानाची चांगली वागणूक द्यावी