पिंपरी: शहरात सातत्याने एटीएम फोडून चोरीच्या घटना समोर येत आहेत. एटीएमची जबाबदारी असलेल्या एजन्सीकडून सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केला जात आहे. असे दुर्लक्ष केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सज्जड इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.
एटीएमची देखभाल आणि सुरक्षेसाठी बँकांकडून एजन्सीची नेमणूक केली जाते. त्यांच्या बेजबाबदारीने एटीएम फोडण्याच्या घटना घडत आहेत. हरियाणा येथील एका टोळीने भोसरीतील पांजरपोळ येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडले. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली. पांजरपोळ येथील एटीएमची जबाबदारी असलेल्या संस्थेचा हलगर्जीपणा आढळून आल्यास त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येईल, असेही आयुक्तांनी खडसावून सांगितले.
बँकांनी नवीन एटीएम सुरू करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी. सुरक्षेचे मापदंड पाळून एटीएम सुरू करावे. एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्यासाठी सायरन आणि अन्य तांत्रिक बाबींचा समावेश करावा. ते चालू स्थितीत असल्याचे वारंवार तपासायला हवे. पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालताना देखील नेहमीच लक्ष ठेवतात. चिखली येथे पोलिसांनी रात्री लक्ष ठेवल्यामुळे एक एटीएम फोडीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे बँकांनी पोलिसांना एटीएमची माहिती तर द्यावीच. परंतु नवीन सुरू करताना पोलिसांची परवानगी घेतली पाहिजे. त्याबाबत बँकांना पोलिसांकडून पत्र देण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
बँकांची जबाबदारी काय?
बँकांकडून एजन्सीकडे एटीएमची सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. त्यासोबतच एटीएमला विमा संरक्षण घेण्यात येते. परिणामी एटीएमची तोडफोड किंवा चोरी झाल्यास संबंधित बँकेला विम्याची रक्कम मिळते. त्यामुळे त्यांच्याकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. एटीएमच्या सुरक्षेबाबत बँकांची जबाबदारी काय आहे, याबाबत माहिती घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.