रहाटणी : पिंपळे गुरव येथील दत्तनगर बुद्धविहाराजवळील पवना नदी घाटावर सातव्या दिवसाचे गणपती विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या शिवाजी चंदर शिंदे (वय २२) याचा गुरुवारी दुपारी गणेश विसर्जनावेळी बुडून अंत झाला. त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. या घाटावर कोणत्याच प्रकारची सुरक्षाव्यवस्था नसल्याचे आढळून आले आहे. सुरक्षारक्षक आणि जीवरक्षकाचा अभाव असल्याने ही घटना घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. दुर्घटना घडल्यानंतर महापालिकेने घाईघाईत काही उपाययोजना करण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे.पिंपळे गुरव, दत्तनगर येथील बुद्धविहार घाटावर गणपती उत्सवाच्या सातव्या दिवशीही कोणत्याही प्रकारची सुरक्षेची दक्षता घेतली नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. शिवाय घाटावर कोणतीही आपत्कालीन उपायोजना करण्यात आली नव्हती. या घाटावर फक्त एक आरोग्य विभागाचा कर्मचारी तैनात होता. हा कर्मचारी दुपारी तीन ते रात्री १० अशी त्याची नेमणूक होती.या विसर्जन घाटावर एका युवकाच्या नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासन जागे झाले असून, या घाटावर सुरक्षेसाठी आठव्या दिवशी बांबू बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विद्युतव्यवस्था नाही. खांबावर दिवे आहेत; मात्र त्यातील काही बंद असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. नदीपात्रात निर्माल्य टाकू नये म्हणून घाटावर निर्माल्यकुंडाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र या घाटावर ही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिक नदीतच निर्माल्य टाकीत आहेत.
सुरक्षाव्यवस्थेचा बोजवारा, दुर्घटनेनंतर प्रशासनाची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:18 AM