तळेगाव दाभाडे : नगर परिषदेने थकीत मालमत्ता करवसुलीची मोहीम अधिकच तीव्र केली आहे. याआधीच ८५६ मोठ्या थकबाकीदारांना वॉरंट बजावले असून, त्यानुसार पालिकेने ३ दिवसांत १८ स्थावर मालमत्ता सील केल्या आहेत. पालिकेकडून सगळ्यात मोठे थकबाकीदार नॅशनल हेवी इंजिनियरिंग कंपनी, तसेच शहरातील मोबाईल टॉवर यांचा समावेश आहे. तसेच मायमर कॉलेज व इतर ८० मालमत्तांचे नळजोड तोडण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. जप्तीची कारवाई सुरू करताच अनेक मोठ्या थकबाकीदारांनी आपला मालमत्ताकर त्वरित जमा केलेला दिसून येत आहे.करवसुलीचे अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी संपूर्ण पालिका प्रशासन सध्या कामाला लागले असल्याचे चित्र आहे. पालिकेने कर वसुलीसाठी ८ पथके तयार केली आहेत. त्यानुसार सुनील कदम, प्रवीण माने, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, संभाजी भेगडे, प्रवीण शिंदे व विशाल मिंड हे वसुली अधिकारी, करनिरीक्षक विजय भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारपासून मालमत्ता जप्तीची कारवाई करीत आहे. दरम्यान, काही अप्रिय कारवाई होऊ नये यासाठी थकबाकीदारांनी आपल्याकडील कराचा भरणा त्वरित करून नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा जगनाडे व मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केले आहे.(वार्ताहर)
नगर परिषदेकडून जप्तीची कारवाई
By admin | Published: March 21, 2017 5:10 AM