पिंपरी : शहरातील गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठी अवैध धंद्यांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही अवैधधंदे सुरू असल्याचे निदर्शनास येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची माहिती काढली जात असून त्यांची वेगळी नोंद होत आहे. महिन्याभरात त्यांची उचलबांगडी करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. आयुक्तांचा चेहरा म्हणून या पथकाने कारवाईचा धडाका सुरू केला. आत्तापर्यंत १७५ पेक्षा जास्त कारवाई या पथकाने केल्या आहेत. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत किती आणि कोणते अवैध धंदे सुरू आहेत, हे समोर आले. परिणामी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांचे धाबे दणाणले. आयुक्तांनी सूचना दिल्यानंतरही संबंधित पोलीस निरीक्षकांनी अवैध धंदे बंद किंवा त्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली. आयुक्तांनी अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. तत्पूर्वी पोलीस आयुक्तांयनी सामाजिक सुरक्षा विभागातील सात कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली. याबाबत शहर पोलीस दलात चर्चा सुरू आहे.
सामाजिक सुरक्षा पथकाकडून कारवाया सुरूच आहेत. काही अवैधधंद्याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना माहिती असणारच आहे. अशा कारवाया होत असलेल्या पोलीस ठाण्याच्या अधिका-यांची नोंद होत आहे. काही पोलीस निरीक्षकांकडून त्याबाबत खुलासा मागवला आहे. महिन्याभरात जनरल बदल्या करण्यात येणार आहेत. कार्यक्षम नसलेल्या वरिष्ठ निरीक्षकांची त्यावेळी बदली केली जाणार आहे, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
‘बदली केलेल्यांना मी निवडले नव्हते’ सामाजिक सुरक्षा पथकातून तडकाफडकी करण्यात आलेल्या सात पोलीस कर्मचा-यांचे व्हेरिफिकेशन मी केलेले नव्हते. त्यांच्या विनंतीवरून त्यांना या पथकात नियुक्त केले होते. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. या पथकातील माझी काही माणसे मला माहिती देत असतात. याच माहितीच्या आधारे सात कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी पाठविण्यात आले, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.