कामशेत : मुंबई-पुणे महामार्गावरील पवनानगर फाटा येथे मागील दीड वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळविली आहे. सेवा रस्त्याच्या कडेला पावसाचे व सांडपाणी यासाठी सिमेंट पाईप गटार व्यवस्था केली असून, या ठिकाणी चेंबर लावले नसल्याने येथे अपघाताचा धोका संभवत आहे.
उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपूनही प्रगती नाही. या कामात अनेक कामे प्रलंबित राहिल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. महामार्गावरील वाहतूक उड्डाणपुलाच्या कामासाठी आठ महिन्यांपूर्वी सेवा रस्त्याने वळविली आहे. या सेवा रस्त्याच्या कडेला सांडपाणी तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्था केली आहे. कामशेत खिंड ते नायगाव ओढा भागापर्यंत सिमेंट पाईप टाकण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी चेंबर पाईपच्या साईजचे नाही अथवा इतर कारणाने लावण्यात आले नसल्याने सेवा रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी गटारी उघड्या आहेत. काही भागात उड्डाणपुलाच्या कामाचे आरई पॅनल या उघड्या गटारींवर तात्पुरते टाकून झाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एखादे वाहन या भागात शिरून प्रवाशांच्या जिवास धोका होऊ शकतो. खडीवरून घसरून अनेक दुचाकीस्वार यात पडत आहेत, तर चारचाकी वाहने या भागात वाहनावरील नियंत्रण सुटून अडकत आहेत. मागील आठवड्यात एक चारचाकी वाहन या खड्ड्यात पडता पडता वाचले.कामशेत भागातील खराब झालेला सेवारस्ता पुन्हा एकदा बनवण्यात आला असून, या रस्त्यावर खडी मोठ्या प्रमाणात टाकल्याने मोठी अवजड वाहने जाऊन खडी रस्त्याच्या कडेला साचली आहे. यातून प्रवास करताना दुचाकीस्वार घसरून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.लोणावळा, खंडाळा आदी ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे रस्त्याचा अंदाज न आल्याने व खडीवरून दुचाकी घसरून अपघात होत आहेत. या किरकोळ अपघातांची तक्रार ते पोलीस ठाण्यात न करता निघून जात नसल्याने या भागातील रस्त्याचे गांभीर्य एमएसआरडी राज्य रस्ते विकास महामंडळ व संबंधित ठेकेदार कंपनी यांना कळत नसल्याचे काही जागरूक नागरिक सांगत आहेत.