पिंपरी : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कामाच्या वर्क ऑर्डरची फाईल तयार करण्यासाठी एक लाखांची लाच स्वीकारणाऱ्या अनुरेखक कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)ने मंगळवारी (दि.२१) रंगेहाथ पकडले. या कर्मचाऱ्याला महापालिकेने सेवानिलंबित करून त्याची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची देखभाल दुरुस्तीची कामे करणाऱ्या ठेकेदाराकडून १ लाख ५ हजार रुपयांची लाच घेताना अनुरेखक दिलीप भावसिंग आडे (वय ५१) याला एसीबीने अटक केली. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर महापालिका सामान्य प्रशासन विभागाने लाच घेणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याविरुध्द कारवाई प्रस्तावित केली. आडे याला महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आले असून त्याची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.