पिंपरी : जमावबंदी व संचारबंदी दरम्यान मद्यविक्रीचे प्रकार समोर आले आहेत. पोलिसांनी ठिकठिकाणी छापा टाकून ३२ गुन्हे दाखल केले आहेत. यात मद्यसाठ्यासह सहा लाख ९९ हजार ७३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १५ ते ३० मार्च दरम्यान ही कारवाई करण्यात आली.देशाात कोरोनाग्रस्त पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. त्यानंतर महाराष्ट्रात या आजाराची लागण झाल्याचे समोर आले. त्याच्या पहिल्या टप्प्यात देशात कोरोनाग्रस्त सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात होते. त्यामुळे देशात सर्वात आधी उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदी करण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाने संचारबंदी व केंद्र शासनाने देशात लॉकडाऊन केले. याचा गैरफायदा घेत काही जणांनी दारुचा साठा केला, तर काही जणांनी दारुची वाहतूक केली, काही जणांनी गावठी हातभट्टी दारुची विक्री करून जमावबंदी, संचारबंदी व लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ठिकठकाणी छापेमारी करून कारवाई केली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पिंपरी, चाकण, वाकड व देहूरोड असे चार विभाग असून, एकूण १५ पोलीस ठाणे आहेत. या चारही विभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. यात मोठा मद्यसाठा तसेच इतर मुद्देमाल जप्त केला. यात सर्वाधिक शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत चार लाख २० हजार ३०० रुपयांचा तर त्याखालोखाल पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक लाख ८३ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल व मद्यसाठा जप्त करण्यात आला.
दोन आठवड्यांत ७७८ दुकानदार, वाहनचालकांवर गुन्हेजमावबंदी, संचारबंदी व लॉकडाऊन असतानाही दुकाने सुरू ठेवल्याने व छुप्या पद्धतीने दुकानातील साहित्याची विक्री केल्याप्रकरणी दोन आठवड्यांत ७७८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जीवनाश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळून इतर वस्तूंच्या दुकानांना तसेच आस्थापनांना बंद ठेवण्याचे आदेश होते. मात्र या आदेशाचे काही जणांकडून उल्लंघन करण्यात आले. तसेच विनाकारण घराबाहेर पडून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाºया नागरिकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना दंडसंचारबंदी व लॉकडाऊन असतानाही टेम्पोतून प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोमालक संतोष रामदेव पांडे व टेम्पोचालक रामदयाल फत्तेनारायण पांडे यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे जिल्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यां नी संतोष पांडे व रामदयाल पांडे यांना प्रत्येकी पाच हजार असा एकूण १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. भारतीय दंड विधान कलम १८८, २६९, २७०, २७१, २९० तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना कायदा कलम ११ अन्वये ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.