पिंपरी : फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून आठ जणांना ५२ लाख ७३ हजारांचा गंडा घालणाऱ्या तसेच चार वर्षांपासून फरार असलेल्या सराईताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने दिघी प्राधिकरण परिसरात सापळा रचून ही कारवाई केली.
महेश बापू लोंढे (वय ४२, रा. गुरव पिंपरी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरॅकल ९, वडमुखवाडी या ठिकाणी फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून महेश लोंढे याने आठ जणांकडून ५२ लाख ७३ हजार ४३४ रुपये घेतले. त्यानंतर पैसे किंवा फ्लॅट न देता फसवणूक करून आरोपी पसार झाला. या प्रकरणी दिघी तसेच एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, आरोपी हा २०१८ पासून फरार असून वेगवेगळ्या ठिकाणी ओळख बदलून राहत होता. दरम्यान, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लोंढे हा मोशी प्राधिकरण परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाईसाठी दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.