पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवास सुरुवात झाली. भक्ती-शक्ती चौक, निगडीतील सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन झाले. शाहिरी जलसा, प्रबोधनपर गीत गायन, गरजला सिंहाचा छावा कार्यक्रम आणि भव्य बँड स्पर्धेने कार्यक्रमांत रंगत आणली.निगडीतील उद्घाटन सोहळ्यास महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, विधी समिती सभापती शारदा सोनावणे, नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, नामदेव ढाके, नगसदस्या सीमा चौघुले, माधवी राजापुरे, कमल घोलप, यशोदा बोईनवाड, निकिता कदम, अनुराधा गोरखे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘समाजाच्या उन्नतीसाठी सर्व पदाधिकारी, नगरसदस्य, नगरसदस्या काम करत आहेत. झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी काम केले जाईल. अण्णा भाऊ साठे यांच्या वारसांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न केले जातील. शहरातील गोरगरीब, दलित बांधवांसाठी केंद्र, राज्य व महापालिका राबवित असलेल्या योजना, अनुदान, शिष्यवृत्ती आदीं लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. आयोजित पाच दिवसीय जयंती महोत्सवाचा सर्वांनी शांततेत लाभ घ्यावा. सामाजिक कार्यकर्त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे विचार व साहित्य सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे.’’ गणेश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले तर आभार नगरसदस्य उत्तम केंदळे यांनी मानले.दरम्यान सकाळ सत्रात चंदन कांबळे आणि संच यांचा शाहिरी जलसा, कुमारी पल्लवी घोडे यांचा प्रबोधनपर गीत गायनाचा तर शाहीर बापू पवार यांचा गरजला सिंहाचा छावा हा कार्यक्रम सादर करण्यात आला. दुपार सत्रात भव्य बँड स्पर्धा व सनई वादनासह शैलेश लेले यांचा महाराष्ट्राचा शाहिरी बाणा हा कार्यक्रम झाला.
शाहिरी जलसा, गरजला छावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:40 AM