पराग कुंकुलोळ चिंचवड : क्रांतिवीर चापेकर बंधुंनी २२ जून १८९७ रोजी इंग्रज अधिकारी वाल्टर्स रँड याला बंदुकीने वेधले म्हणून हा दिवस प्रतिशोध दिन म्हणून संबोधला जातो. चापेकर बंधुंच्या याच पराक्रमाचा पोवाडा शाहिरीजागर या युवाशाहिरांच्या पथकाने सादर केला आहे. चिंचवडगाव येथील 'चापेकर वाडा' या क्रांतीतिर्थावर या पोवाड्याचे सादरीकरण व चित्रीकरण झाले आहे. लोककलावंत आसाराम कसबे यांनी काही वर्षांपूर्वी लिहीलेला हा पोवाडा युवाशाहीर चारूदत्त जाधव याने गायला आहे. आदेश देरवणकर (ढोलकी), अजय चव्हाण ( हारमोनियम) , शुभम साळवे (टाळ), निखिल बनकर , प्रतीक लोखंडे, हृषीकेश राहिंज (कोरस) अशी साथसंगत या पोवाड्यास मिळाली आहे. विजय कापसे व हर्ष राऊत यांची साथ तसेच हर्ष कलगोत्रा याने ध्वनी मुद्रण केले आहे. त्याबरोबरच निमेश हिरवे, कुणाल अभंग व अथर्व पुराणिक यांनी छायाचित्रण केले आहे.चापेकर बंधुंचे बालपण, त्याकाळातील दुष्काळ व प्लेगची साथ व त्याबरोबरच इंग्रजाकडून होणारे अत्याचार त्याच अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी चापेकरांनी घेतलेला धाडसी निर्णय व रँडचा वध असा समग्र पोवाडा आपल्याला क्रांतीवीर चापेकर बंधुच्या पराक्रमाची साक्ष देणारा आहे.चापेकर स्मारक समितीचे गिरीशजी प्रभुणे, सिध्देश्वर इंगळे, मारूती वाघमारे यांचे विशेष सहकार्य व आसाराम कसबे यांचे मार्गदर्शन या पोवाड्यास मिळाले आहे. हा पोवाडा शाहिरीजागर युट्युब चॅनेलवर २२ जूनपासून पाहायला मिळणार आहे.
.................
विविध पोवाडे, शाहीर, शाहिरी परंपरा, शाहिरी बाज व इतिहास या विषयांवरील डॉक्युमेंट्रीजमधून लोकांसमोर शाहिरी नव्याने घेऊन जाण्याचा शाहिरीजागर या युटुबचॅनेलचा प्रवास सुरू आहे. युवापिढीने हाती घेतलेल्या या कायार्ची समाजातून प्रशंसा होत आहे.