लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महामेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या टप्प्याचे काम वल्लभनगरजवळ सुरू आहे. त्या ठिकाणी महामेट्रो कंपनीकडून आवश्यक उपायोजना न केल्याने रविवारी मध्यरात्री रस्त्यावरील कामगारांना कंटेनरने ठोकरले. परंतु, या जखमी कामगारांविषयी पोलिसांत कोणतीही तक्रार न देता, कंपनीकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. उद्योगनगरीतील महामेट्रोच्या कामास अपघातााने प्रारंभ झाला आहे. अपघातामध्ये कामगार जखणी झाले. तसेच, दुभाजकावरील पत्रे, बॅरिकेड्स रस्त्यात अस्ताव्यस्त पसरले होते. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रस्त्यात पडलेले बॅरिकेड्स बाजूला हटविले. त्यानंतर हा रस्ता वाहतुकीला खुला झाला. विनायक देवेंद्र बडोदिया (२१, रा. पिंपरी) व नितीन धनंजय सुरवसे (रा. नेहरूनगर) हे दोघे या अपघातात जखमी झाले आहेत. तर, कंटेनरचालक अंकुश शिवाजी म्हस्के याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु, जखमींनी तक्रार द्यायची नसल्याचे पोलिसांना सांगितले. तक्रार नसल्याने पोलिसांनी कंटेनर चालक म्हस्के यास सोडून दिले. अपघातात दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले, तरी याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल न करण्यामागील कारण काय असावे व कोणाचा दबाव आहे, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
महामेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा अपघाताने
By admin | Published: June 20, 2017 7:18 AM