पिंपरी : कासारवाडीतील शंकरवाडी येथील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत आहे. या घाण पाण्यातून वाहन काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. दुरुस्ती करूनही पाणी तुंबत आहे. महापालिकेतर्फे करण्यात आलेली दुरुस्ती निव्वळ देखावा असल्याचा रोष संतप्त नागरिकांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात लोकमतने वारंवार वृत्त देऊन पाठपुरावा करीत आहे. त्याची दखल घेत गेल्या महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात येथे भूमिगत वाहिनी टाकून झाकण बसविण्यात आले. मार्गाच्या बाजूने असलेल्या नाल्याचा कठडा तोडण्यात आला. सुरुवातीला काही दिवस यातून पाणी वाहून गेले. मात्र, तेथे मोठ्या प्रमाणात माती साचल्याने झाकण्याचे छिद्र बंद झाली आहेत. तसेच, कठड्यातून पाण्याचा निचरा संथ झाला आहे. यामुळे पूर्वीप्रमाणेच मार्गात पाणी साचून राहत आहे. भूमिगत वाहिनी टाकल्यानंतर त्याचे काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण केले गेले नाही. त्यावर केवळ माती टाकून तात्पुरती दुरुस्ती केली गेली आहे. पावसात ही माती निघून जाऊन खड्डा पडला आहे. याचबरोबर येथील रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. महापालिकेने दुरुस्ती करूनही पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दुरुस्तीचा देखावा न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
शंकरवाडीत भुयारी मार्ग तुंबला
By admin | Published: October 05, 2015 1:37 AM