हणमंत पाटील
पिंपरी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजीनामा अस्त्र अन् विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेने बदलत्या राजकीय समीकरणाची देश, राज्य व पिंपरी-चिंचवड शहरात चर्चा रंगली आहे. शहरातील राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष महाविकास आघाडीत आजही सर्वकाही अलबेल आहे. आमची मविआची वज्रमूठ मजबूत असल्याचा दावा ते करीत आहेत. त्याचवेळी भाजप व शिवसेना युतीचे नेते मात्र सावध पवित्र्यात असून, ते वॅट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत दिसतायेत.
‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या पुण्यातील विशेष मुलाखतीत अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची संधी हुकल्याची खंत व्यक्त केली. त्याचा पुनर्उच्चार पिंपरी-चिंचवड शहरातील जाहीर कार्यक्रमातही काही दिवसांपूर्वी झाला. त्यामुळे अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन धक्कातंत्राचा वापर केला. त्यामुळे राजकीय घडामोडी व नवीन राजकीय समीकरणाचा परिणाम आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
नेते, शहराध्यक्षांची सावध भूमिका...
आगामी महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत बदलत्या घडामोडींचा काय परिणाम होईल, याविषयी शहरातील प्रमुख राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष, पदाधिकारी व आमदार यांनी सावध पवित्रा घेत आपली भूमिका मांडत आहेत.
- शरद पवारसाहेब यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी राष्ट्रवादीतील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपेक्षा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी अभेद्य राहून आमचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री होतील. - अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी.
- महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम बांधली आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींचा आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. पुढील सर्व निवडणुुका मविआ एकत्रपणे लढविणार असल्याचा निर्णय झाला आहे. - कैलास कदम, शहराध्यक्ष, कॉंग्रेस.
- शरद पवार यांचा राजीनामा ही त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. तसेच, अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. या दोन्ही घटनांचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. - ॲड. सचिन भोसले, शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप व शिवसेना युती भक्कम आहे. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत घडामोडींचा आमच्या युतीवर कसलाही परिणाम होणार नाही. - बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा हा त्या पक्षाच्या अंतर्गत घडामोडी आहेत. या विषयावर भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा अथवा बैठक झालेली नाही. - उमा खापरे, आमदार, विधान परिषद, भाजप.