पिंपरी :मावळ लोकसभेसाठी आता प्रचाराच्या तोफा धडाडू लागतील. त्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून प्रत्येक पक्षांने मावळातील बैठकांचे आणि सभांचे नियोनन केले आहे. महाविकासआघाडीचे संजोग वाघेरे आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यामध्ये होणारी मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक नात्यागोत्यामुळे प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे इथे प्रचाराला त्या तोलामोलाचे प्रचारक लागणार असल्याची चर्चा आहे. सभेसाठी मैदानांचे बुकींग करण्यासाठी पक्षांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे.
मतदारांपर्यंत पोचण्यासाठी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बारणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता गोंविदा, उदयनराजे भोसले आदींसह राज्य व केंद्रातील मत्र्यांच्या तोफा मावळमध्ये धडाडणार आहेत. वाघेरे यांच्या प्रचारासाठी शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे, चंद्रकांत हंडोरे, शशिकांत शिंदे यांच्याबरोबरच शेकापचे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत.
अभिनेता गोविंदासह, भाजपचे केंद्रीय मंत्री प्रचाराला-
बारणे यांच्या प्रचारासाठी केंद्रातील मंत्री मावळ मतदारसंघात येणार आहेत. सध्या केंद्रातील मंत्री या भागातील भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यग्र आहेत. ४ ते १० मेच्या मावळ मतदारसंघात प्रचारासाठी येणार असून, सभांबरोबरच प्रचार फेऱ्या, मेळावे यांचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजप कार्यकर्ते आणि श्रीरंग बारणे यांच्यामध्ये मनोमीलन झाल्यामुळे शहरात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बारणे यांच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत. अभिनेता गोंविदा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी यांची सभा ‘१० मे’ला होणार असल्याची माहिती श्रीरंग बारणे यांचे प्रचारप्रमुख प्रमोद कुटे यांनी दिली.
उध्दव ठाकरे, शरद पवार यांच्या सभा-
संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी उध्दव ठाकरे यांची ८ मेला सांगवी येथे सभा होणार आहे. यावेळी शरद पवार, नाना पटोले हेही उपस्थित राहणार आहेत. तसेच सुषमा अंधारे, नितीन बानगुडे-पाटील, युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शशिकांत शिंदे, चंद्रकांत हंडोरे यांच्याही सभा होणार आहेत. तसेच रोहित पवार, आदित्य ठाकरे यांचे ‘रोड शो’ होणार आहेत, अशी माहिती संजोग वाघेरे यांचे प्रचारप्रमुख योगेश बाबर यांनी दिली.
घाटाखालीही होणार सभा -
मावळ मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. घाटावर पिंपरी, चिंचवड आणि मावळ तर घाटाखाली उरण, कर्जत, पनवेल असे मतदारसंघ आहेत. त्यामुळे घाटावर आणि घाटाखाली अशा दोन ठिकाणी प्रचारकांच्या सभा घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे उमेदवारांचा कस लागणार आहे.