पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडून या गुन्ह्यांचा कसून तपास सुरू आहे. त्यात वाकड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सायबर पोलिसांनी चार संशयितांना अटक केली. या संशयितांनी आयबीकेआर सेक्युरिटीज या कंपनीत एका महिलेला पैसे गुंतवण्यास भाग पाडून तिची फसवणूक केली. या प्रकरणाचे धागेदोरे थेट बँकॉकपर्यंत पोहोचल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
पोलिस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील एक महिला फेसबुकवर आयबीकेआर क्रेसेट अकादमी गोल्डमन सच हा व्हाटसअप ग्रुप दिसला. महिला त्या ग्रुपला जॉईन झाली. तिथे लोकांना गुंतवणुकीवर नफा होत असल्याचे दिसले. त्यामुळे महिलेने आयबीकेआर सेक्युरिटीज या कंपनीत पैसे गुंतवण्यास तयारी दर्शवली. त्यांनतर संशयितानी महिलेला एक लिंक पाठवून ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर महिलेने केलेली गुंतवणूक आणि त्यावर झालेला नफा दिसत होता. मात्र ते पैसे काढता येत नव्हते. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने महिलेने याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. महिलेची १० लाख ६९ हजार ५७५ रुपयांची फसवणूक झाली. हा गुन्हा सायबर सेलकडे वर्ग केला.
सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून संशयितांची ओळखत पटवली. विकास नेमीनाथ चव्हाण (४३, रा. गणेश नगर, नवी सांगवी), प्रदीप कृष्णा लाड (३२, रा. पिंपळे गुरव, सांगवी) या दोघांना अटक केली. संशयित हे फसवणुकीच्या पैशातून गुजरात येथील सोनाराच्या दुकानातून सोने खरेदी करत असल्याबाबत सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी यांना माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे आणि फिर्यादी महिलेने संशयिताच्या बँक खात्यावर भरलेले पैसे यांचे तांत्रिक विश्लेषण करून गुजरातमधून संशयित अमित जगदीशचंद्र सोनी याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
संशयित सोनी याच्याकडे चौकशी केली असता, तो सोन्याच्या व्यापाऱ्यांकडून सोने घेतो आणि त्याचे रोख रकमेत रुपांतर करतो. ती रोख रक्कम सोनी हा अहमद नजीर गाझी याला देत होता. अहमद नजीर गाझी हा ती रोकड मुफ्दल व त्याचा भाऊ आबिद याला युएसडीटीमध्ये क्रिप्टोकरन्सी खरेदी करून पाठवत असल्याचे तपासात समोर आले.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त डाॅ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक सागर पानमंद, प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमन, पोलिस अंमलदार अतुल लोखंडे, कृष्णा गवळी, रजनिश तारु यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी ‘कनेक्शन’
संशयित अहमद याचा सख्खा भाऊ आबिद व मुफ्दल हे दोघे बँकॉक येथे राहतात. ते तिथल्या आंतराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीसोबत काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयितांनी अद्यापपर्यंत सहा खात्यांमधील पैसे काढून रोख रक्कम युएसडीटीमध्ये बँकॉकला पाठविल्याचे समोर आले. संशयितांच्या सहा खात्यांविरुध्द भारतामध्ये १७७ तक्रारी अर्ज पोलिसांकडे आले आहेत. त्यामध्ये १०० कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली.