पिंपरी : राज्य सरकारने अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा आणि अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात काही त्रुटी असून त्या कमी करण्यात येतील. तसेच बांधकाम नियमितीकरणा संदर्भात दंड आणि जाचक अटी शिथील केल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने चिंचवडगावात उभारण्यात येणा-या राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्याच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे, रवी नामदे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, भाजपाचे नेते आझम पानसरे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. परंतु, त्यामध्ये त्रुटी आहेत. नियमावलीतील अटी देखील जाचक असल्याच्या तक्रारी येत आहे.याबाबत लवकरच आपण स्वतंत्र बैठक घेऊन त्या दूर करणार आहोत. अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचे शुल्क किती आकारावे हे पालिकेला ठरविण्याचा अधिकार दिला आहे. महापालिका ठरवेल तेवढे शुल्क आकारण्यात येईल. सर्वांचे घर अधिकृत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपण पांडुरंगाला स्मरतो. पण माझ्यासाठी महाराष्ट्रातील बारा कोटी जनता विठ्ठल-रखुमाईसारखी असून आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपले दर्शन घेण्याचा मला योग आला. हा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे. पांडुरंग आपल्या जीवनात आनंद आणो. आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, चिंचवडला भक्ती आणि शक्तीची परंपरा आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात चापेकर बंधूचे योगदान मोलाचे आहे. चापेकर बंधूंचे स्मारक उभारले जाणार असून क्रांतीकारकांच्या परंपरेला अभिवान करण्यासाठी हे संग्रहालय उभारले जाणार आहे.श्रावण हर्डीकर यांनी आभार व सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
..........................प्रोटोकॉलचे उल्लंघनमहापालिकेचा कार्यक्रम असताना शासकीय कार्यक्रमांसाठी असणाऱ्या प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले. पहिल्या रांगेत महापालिकेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना जागा दिली नव्हती. त्याऐवजी महापालिकेत कोणतेही पद न भूषविणारे भाजपाचे पदाधिकारीच पहिल्या रांगेत बसले होते. महापालिकेच्या व्यासपीठावर भाजपाच्या शहर पदाधिकाºयांचाच भरणा अधिक होता. तर महापालिकेतील गटनेते मागील रांगेत बसले होते.
........................गोंधळ होऊ लागल्याने आटोपते घेतले भाषण मराठा मोर्चा आणि घर बचाव संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे कार्यक्रमास अभूतपूर्व बंदोबस्त होता. तपासणी करूनच नागरिकांना कार्यक्रम स्थळी सोडले जात होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांत प्रेक्षकांतील एका महिलेने उभे राहून घोषणा बाजी केली. त्यावेळी पोलिसांनी तिला पकडून बाहेर नेले. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर नागरिक उभे राहिले होते. काही काळ नागरिक उठून उभे राहून मागे काही झाले आहे का? हे पाहत होते, ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आली. त्यांनी भाषण आटोपते घेतले.