पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा भाजपा प्रवेशाबाबतची रंगत असतानाच भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी शीतलबाग पादचारी पुलाच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शीतलबाग पुलाच्या वाढीव खर्चाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे दादांना शह देण्यासाठी भाऊंचा प्रयत्न तर नसेल ना, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तशा राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून लक्ष्मण जगताप यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी फोडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस आणली जात आहेत. विविध प्रकल्पांवर अनाठायी खर्च केला जात आहे, याबाबत भाजपाकडून आक्षेप नोंदविले जात आहेत. राष्ट्रवादी नगरसेवक आणि अपक्ष आमदार म्हणून लांडगे निवडून आले आहेत. लांडगे भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा वर्षभरापासू्न रंगली आहे. मात्र, याबाबत लांडगे यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, त्यांच्या समर्थकांकडून दादा लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत, अशी आवई उठविली जात आहे. भोसरी विधानसभेतील उमेदवारीचे अधिकार लांडगे यांना दिले गेले आहेत, असा दावा समर्थकांनी केला आहे. अशी व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावरील चर्चा रंगली आहे. दरम्यान, लांडगे आग्रही असणाऱ्या भोसरीतील शीतलबाग पुलाबाबत चिंचवडचे आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. ७१ लाख ५ हजार रुपये खर्च अपेक्षित असणाऱ्या पुलाचे बांधकाम साहित्यात वाढ झाल्याचे कारण पुढे करीत सुरुवातीला खर्च अडीच कोटींवर, त्यानंतर या पुलाच्या खर्चात वाढ तब्बल आठपट वाढ करून तो साडेपाच कोटींवर नेला आहे. या पादचारी पुलासाठी एका सपोर्ट कॉलमऐवजी दोन सपोर्ट कॉलम उभे करण्याच्या नावाखाली खर्चात आणखी दोन कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचा खर्च ७१ लाखांवरून थेट साडेसात कोटी रुपयांवर पोहोचल्याचे जगताप यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे चौकशीचे आदेश दिल्याने दादांना भाऊ शह तर देत नसतील ना, अशी चर्चा शहरात रंगली आहे. (प्रतिनिधी)
शीतलबाग पुलाची चौकशी
By admin | Published: September 13, 2016 12:55 AM