कामशेत : शहराजवळील नायगावच्या हद्दीतील मध्य रेल्वेच्या अप ट्रकवर शुक्रवार ( दि. ३० ) रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बंगळूरवरून मुंबईकडे दिशेने जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेसची धडक बसून झालेल्या अपघातात एका मेंढपाळासह सुमारे १० ते १२ मेंढ्यांचा जागीच मृत्यु झाला. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार ( दि. ३० ) रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नायगाव हद्दीत बाळू चिंधू चोपडे याच्या शेताच्या बाजूला माळरानात शेळ्या चरत असताना अचानक काही कुत्रे मेंढ्यांच्या कळपात शिरल्याने मेंढरे रेल्वे ट्रॅकवर ( रेल्वे किलोमीटर नंबर १४५/३१/३३ ) आल्या त्यांना हुसकवण्याच्या प्रयत्न करीत असताना मागून आलेल्या एक्सप्रेसची धडक बसुन मेंढपाळ धूळा दामु कोकरे ( वय ४५, रा. खामकर झाप, पो, शिरापूर, ता. पारनेर जि.अहमदनगर ) ( सध्या रा. नायगाव, मावळ ) यांचा व त्यांच्या सुमारे १० ते १२ मेंढरांचा जागीच मृत्यु झाला. नायगावच्या हद्दीत रेल्वेच्या ट्रॅक जवळ बाळू चिंधु चोपडे यांच्या शेताजवळ धुळा कोकरे यांच्या सह इतरांचा मेंढ्यांचा तांडा मुकामी आला होता. यावेळी तिथे असलेल्या स्थानिक कुत्र्यांनी जोरजोरात भुंकल्यामुळे व कळपात शिरल्याने घाबरलेल्या मेंढ्या रेल्वे ट्रॅकवर आल्या. यावेळी ट्रॅकवर आलेल्या मेंढ्या बाजुला काढत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेसची ( गाडी न ११३०२ ) किलोमीटर न १४५/३२-३४ जवळ धडक बसून धूळा दामु कोकरे व १० - १२ मेंढ्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी तळेगाव स्टेशन लोहमार्ग पोलीस हवालदार संजय तोडमल, प्रियांका नाईक व आरपीआय चे सुर्वे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तर तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कानडे यांनी रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
दुर्देवी !! रेल्वेच्या धडकेत मेंढ्यांसह मेंढपाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 14:58 IST