पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी अवघा दोन दिवसांचा कालावधी उरला असून, प्रचार शिगेला पोहोचला आहे. अंतिम टप्प्यात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी भर उन्हातदेखील अनेक ठिकाणी उमेदवार व कार्यकर्ते प्रचार करताना दिसत होते. यंदा चार सदस्यीय प्रभागपद्धतीमुळे प्रभागाचा विस्तार वाढला असून, मतदारसंख्याही अधिक आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी पायपीट करावी लागत असून, मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक होत आहे. यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचीही पळापळ होत आहे. त्यामुळे उमेदवारांनी दुपारऐवजी सकाळी आणि सायंकाळी प्रचार करण्यावर भर दिला होता. मात्र, आता कमी दिवस उरले असल्याने कशाचीही पर्वा न करता प्रचार करताना दिसत आहेत. प्रत्येक घरासह प्रत्येक मतदारापर्यंत कसे पोहोचता येईल, यासाठीचे नियोजन केले जात आहे. परिचयपत्रकांसह व्होटींग स्लिप पोहोचविण्यासाठीही यंत्रणा कामाला लागली आहे. यासह उमेदवार आणि चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. प्रचार संपण्यास काही तासांचाही कालावधी उरला असल्याने काही उमेदवारांनी शनिवारी सकाळी ७पासूनच प्रचाराचा धडाका सुरु केला. (प्रतिनिधी)तोफा थंडावणार : रविवार होणार प्रचारवार राजकीय नेत्यांच्या सभांचाही धडका सुरू असून, शनिवारी एकाच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा झाल्या. यासह इतरही नेते शहरात प्रचारासाठी होते. त्यातच शनिवार सुटीचा दिवस असल्याने मतदारांच्या भेटीगाठी घेणेही सोयीचे झाल्याचे दिसून आले. उमेदवार दिवसभर मतदारांच्या भेटीसाठी घेण्यासाठी प्रयत्नशील होते. रविवारी जाहीर प्रचाराचा अखेरचा, तसेच सुटीचा दिवस असल्याने रविवारीही मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
शहरात प्रचार शिगेला
By admin | Published: February 19, 2017 4:50 AM