पिंपरी : शिरूर लोकसभेअंतर्गत येत असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानास सुरुवात झाली आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर आत मध्ये मोबाईल नेण्यास बंदी आहे. त्यामुळे मोबाईल असलेल्या मतदारांना पोलीस मतदान केंद्रामध्ये सोडत नाही. परिणामी अनेक मतदार नाराज होऊन माघारी फिरत असल्याचे चित्र आहे.
यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या झालेल्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामधील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये अनेक मतदारांनी त्यांच्या उमेदवाराला मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामधून निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आज पार पडत असलेल्या निवडणुकी वेळी शिरूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या भोसरी विधानसभेमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी केली आहे. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर याबाबत सूचना लावण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशद्वारावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जे मतदार मोबाईल घेऊन येत आहेत त्यांना पुन्हा माघारी पाठवले जात आहे. शंभर मीटरच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची सोय नसल्याने पोलीस प्रशासन आणि मतदार यांच्यामध्ये वादाचे प्रसंग ओढावत आहेत. तसेच अनेक मतदार मतदान न करताच पुन्हा माघारी फिरत आहेत.
वोटर स्लिप मोबाईल मध्येच अनेक मतदारांनी आपले मतदार यादीतील नाव ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्ये शोधले आहे. त्यामुळे त्यांची वोटर स्लिप देखील मोबाईलमध्ये आहे. त्यामुळे असे मतदार मोबाईल घेऊनच आतमध्ये जाण्याचा आग्रह धरतात. परिणामी पोलीस प्रशासन आणि मतदार यांच्यामध्ये खटके उडत असल्याचे चित्र भोसरी परिसरामध्ये आहे.