लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला भाजप संपवत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच मित्र पक्षांनी मिळून त्यांना ताकद द्यायला हवी. त्यादृष्टिने पोटनिवडणुकीत दोन्ही जागा उद्धव ठाकरे यांना मित्र पक्षांनी द्यायला हव्या होत्या. या जागांचे निकाल जे लागले असते ते लागले असते. शिवसैनिक हा मित्रपक्षांसोबत कायम राहिला असता, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ‘वंचित’ने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवादीला उमेदवार द्यायचा होता तर त्यांनी ताकदवार उमेदवार द्यायला हवा होता. मात्र, आमच्या लक्षात आले की या उमेदवारामुळे भाजपचाच फायदा होणार आहे. त्यामुळे आम्ही राहुल यांना राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी, असे सुचवले. त्यासाठी प्रचाराला येण्याची मी तयारी देखील दाखवली. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. म्हणून आम्ही राहूल यांना पाठींबा दिला. राष्ट्रवादीला २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात मत मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवार येथे ताकदवर नाही, हे दिसून येते.
शिवसेनेसोबत कायम राहणार
उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्याचा मी शब्द दिला. एकदा शब्द दिला तर तो पाळणारच. या निवडणुकी विषयी काही चर्चा होवो मात्र आम्ही शिवसेनेसोबत कायम आहोत. आणि २०२४ ची विधनासभा निवडणुक होईपर्यंत आम्ही शिवसेनेसोबत म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार आहोत. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसैनिकांनी त्यांची ताकद भाजपला दाखवावी, असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केले.
कुळ कायदा रद्द करण्याचा डाव
भाजप सरकारचा कुळ कायदा रद्द करण्याचा डाव आहे. तशा हलचाली मंत्रालय स्तरावर त्यांनी सुरु केल्या आहेत. त्यांना रोखायचे असेल तर सर्वांनी भाजपशी एकजुटीेने लढायला हवे. त्यासाठी युतीमध्ये प्रमाणिकता आली पाहिजे. त्यामुळे फडणवीस जे आत्ता सांगत आहेत ते पुन्हा घडणार नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"