भोसरी : लांडेवाडी चौकातील शिवसृष्टीतील म्युरल्सची पडझड सुरू झाली आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे़ त्याबद्दल शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील १२ चौकांचे सुशोभीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने केले. काही वर्षांपूर्वी याठिकाणी भव्य असे ‘शिवस्मारक’ साकारले होते. याठिकाणी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असून, किल्ल्यांच्या दरवाज्याची भव्य प्रतिकृती आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस आई भवानीचे मंदिर आहे. त्यामुळे येथे शिवसृष्टी साकारली़ सुमारे एक कोटीचा खर्च त्यावर झाला. शिवजयंतीच्या मुहूर्तावर १९ फेब्रुवारी २०१४ रोजी शिवसृष्टीचे लोकार्पण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.शिवसृष्टीमध्ये श्री छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचे २३ देखावे म्युरलमध्ये साकारण्यात आले़ शिवकालीन माहिती, वस्तू, तोफा, मावळी वेशातील पहारेकरी, जिजाऊ तसेच बाल शिवाजी यांची शिल्पे तयार करण्यात आली. शिवसृष्टीमुळे भोसरीच्या नावलौकिकात भर पडली़ तसेच लांडेवाडी चौकातील अतिक्रमणाचा प्रश्नही मार्गी लागला. मात्र, शिवसृष्टीच्या उभारणीनंतरचे काही महिने वगळता महापालिकेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. शिवजयंती वगळता येथील स्वच्छता तसेच म्युरल्सच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, म्युरल्सवरील रंग उडाले आहेत.पुढचे पाठ मागचे सपाट...भोसरी व सांगवीमध्ये शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. भोसरीमध्ये शिवसृष्टी असतानाही इंद्रायणीनगरमध्ये शिवसृष्टी साकारण्यात येणार आहे. चौक सुशोभीकरणांतर्गत हे म्युरल्स बसविण्यात येणार आहेत. याकरिता ६६ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, मे. एस. बी. सवई या ठेकेदाराला त्याचे कामही देण्यात आले आहे. भोसरीमध्ये शिवसृष्टी असूनही त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करून नव्याने शिवसृष्टी उभारण्याचा घाट घातला जात आहे. महापालिकेचा कारभार म्हणजे पुढचे पाठ आणि मागचे सपाट, असे असल्याची टीका शिवप्रेमींमधून होत आहे.म्युरल्सवरील डिझाईनची पडझड झाली आहे. गवत वाढल्याने म्युरल्स झाकली जात आहेत. शिवसृष्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छतेअभावी म्युरल्सवर धुळीचा थर साचला असून, त्यांची चकाकी गेली आहे. शिवसृष्टीच्या वाढत्या दुरवस्थेबद्दल शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेकडे अनेकदा तक्रार करूनही त्याची देखभाल दुरुस्ती करण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष प्रशासनाकडून केले जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शिवसृष्टीला अवकळा, भोसरीतील म्युरल्सची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 2:47 AM