पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले प्रधान आहेत. त्यांच्या साथीला साथ देत आपल्याला पुढील येणारी अनेक वर्षे त्यांची ढाल बनून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अमर करायचे आहेत, त्यासाठी एकत्रित व्हा. आपण बाळासाहेबांचे सच्चे पाईक होऊन दाखवू'', असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
निगडीतील सिझन बेंक्वेट हॉल येथे नुकताच (दि. १७) कामगार नेते इरफान सय्यद यांच्या पुढाकारातून विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या उत्साहात ''बाळासाहेबांची शिवसेना'' पक्षात जाहीर पक्षप्रवेश झाला. यावेळी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, बाळासाहेब वाल्हेकर, नीलेश तरस, राजेश वाबळे, शैलाजी पाचपुते, सरिता साने, संभाजी शिरसाठ उपस्थित होते.
पुढे बोलताना आढळराव म्हणाले, २०१९ मध्ये तीन वर्षांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापनेची वेळ आली. त्यावेळी मी अमेरिकेत होतो. उद्धव साहेबांना फोन करून आपण कुठेतरी चुकतोय? महाराष्ट्रातील शिवसैनिकांची मत तरी जाणून घ्या, हे केल्याने काय होणार आहे. आपल्या हिताचं आहे? असे म्हणालो होतो. परंतु, ते तसे नाही, तुम्ही आल्यावर बोलू, असे म्हणून वेळ मारून नेली. साहेब मुख्यमंत्री होणार, याचा आम्हाला आनंद झाला होता. मात्र, हा आनंद महिनाभर टिकला नाही. सरकारची कार्यप्रणाली आणि वर्तवणूक पाहता सहा महिन्यांत आमचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे शिवसेनेला ताकद मिळालीच नाही.
इरफान सय्यद म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका पाहून राज्यभर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पक्षाबरोबर जोड़ले जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेला आणखी उभारी मिळणार आहे. पुढील काही दिवसांत इतर पक्षांचे नगरसेवक आणि पदाधिकारीही पक्ष प्रवेश करतील. पिंपरी-चिंचवड महापालिका मित्रपक्षांसह काबीज करायची आहे.