पिंपरी : भोसरीतील शिवसेना मेळाव्यात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आमचे ऐकत नाहीत, अशा तक्रारी खासदार संजय राऊत यांच्याकडे केल्या. त्यावर राऊत यांनी, पालकमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्र्यांचं ऐकतात, आपण त्यांना सांगू. दादा, ऐकलं तर बरं होईल, नाहीतर गडबड होईल. तसेही मुख्यमंत्री आज दिल्लीला गेले आहेतच, असे मिश्कील भाष्य केले.
राऊत म्हणाले, पुण्याचे पालकमंत्री आपले नाहीत, ते राष्ट्रवादीचे असल्याने संघर्ष होतो. पिंपरीचे पोलीस आयुक्त शिवसेनेला टार्गेट करतात, अशा तक्रारी कानावर आल्या आहेत. शिवसैनिकांना भीती बाळगण्याचे कारण नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले आहेत, या नात्याने पालकमंत्रीही आपलेच आहेत. या गोष्टी त्यांच्या कानावर घाला. त्यांना आपले ऐकावे लागेल. आपल्याला एकत्र काम करायचे आहे.
पुणे-पिंपरीत घासून नव्हे, ठासून येऊ
- बाळासाहेबांचा जन्म पुण्यात झाला. मात्र, पुण्यात बाळासाहेबांच्या पक्षाची सत्ता नाही, याची खंत आमच्या मनात आहे. पुणे, पिंपरी - चिंचवडमध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करायला लागतो, हे चित्र चांगले नाही.
- येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. महाविकास आघाडी होईल का? नाही, झाली तर काय, नाही झाली तर काय, या भानगडीत पडू नका, असेही ते म्हणाले.