पिंपरी : शहरातील जयहिंद हायस्कूलमध्ये मुले व मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे माहित असतानाही अशाप्रकारे शाळा प्रशासनाने कॅमेरे लावल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील जयहिंद हायस्कूलमधील स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर समाज माध्यमातून याबाबत तीव्र आक्षेप घेण्यात आले. तर पालकांनीही याला विरोध केला. याबाबत विचारणा करण्यासाठी शनिवारी (दि. १६) सकाळी शाळेच्या आवारात काही पालकांनी गर्दी केली होती. हे सीसीटीव्ही तब्बल पाच ते सहा वर्षांपासून स्वच्छतागृहांमध्ये लावले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागालाही खडबडून जाग आली. प्रशासनाने शाळेत जात तेथील कॅमेरे हटवले आहेत. तसेच शाळेला याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
संबंधितांवर गुन्हे दाखल करा - पालक स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही लावणे गुन्हा आहे. हा मुलांच्या गोपनियतेचा भंग आहे. तसेच याबाबतचे व्हिडिओ सामाजिक माध्यमावर गेल्याने शाळा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे सहा वर्षांपासून आहेत. वॉशरुमध्ये कॅमेरे बसवले नसून ते वॉशबेसिनकडे आहेत. त्याठिकाणी मुले हात धुतात. हे कॅमेरे बसवण्यापाठीमागे मुलांची सुरक्षितता हा एकच उद्देश होता. मात्र, पालकांनीच याबाबत तक्रार केल्याने आता सर्व कॅमेरे काढले आहेत. महिला शिक्षकांची ड्युटी सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत आहे. त्यांना कपडे बदलण्यासाठी सांगितले जात नव्हते. त्यामुळे महिला शिक्षकांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत.
- ज्योती मसंद, प्राचार्य, जयहिंद हायस्कूल.