पिंपरी : रेडझोनमधून वगळण्यात आल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठ शुक्रवारपासून खुली झाली. त्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. अशीच गर्दी शनिवारी पिंपरी कॅम्पातील साई चौकात होती. मुख्य बाजारपेठेतील हा चौक असून, येथे रस्त्यावर एका वृद्धाचा मृत्यू झाला. यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे वृद्धाचा मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर पडून होता. या धक्कादायक प्रकारामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त होत आहे. बाजारपेठेतील व्यावसायिकांनी शनिवारी नियमितपणे दुकाने सुरू केली. त्यावेळी साई चौकातील रस्त्यालगत एक वृद्ध झोपला असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. मात्र बराच वेळ होऊनही काही हालचाल होत नसल्याने काही जणांनी त्याच्या जवळ जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याची शंका त्यांना आली. मात्र तो किती वाजता मयत झाला याबाबत निश्चित माहिती त्यांना समजू शकली नाही. काही जणांनी रुग्णवाहिकेसाठी मोबाईल फोनवरून संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला. आता कोरोनाचे रुग्ण आहेत, मृतदेह उचलण्यासाठी आमच्याकडे कर्मचारी नाहीत, तुम्ही पोलिसांना संपर्क साधा, त्यांना सांगा, असे संबंधितांकडून सांगण्यात येऊन रुग्णवाहिका पाठविण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर त्यांनी शंभर क्रमांक डायल करून पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. तुम्ही रुग्णवाहिका बोलावून घ्या, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पुन्हा रुग्णवाहिकेसाठी फोन करून मृतदेह उचलून नेण्याबाबत सांगण्यात आले. मृतदेह उचलून नेण्यासाठी रुग्णवाहिका पाठविण्याऐवजी फोन करणाऱ्या नागरिकांचीच उलट तपासणी घेण्याचा प्रकार संबंधितांकडून सुरू होता. यात बराच वेळ गेला. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
...............................
सुरक्षा साधनांविनाच नागरिकांनी उचलला मृतदेहकाही वेळानंतर रुग्णवाहिका साई चौकात दाखल झाली. दरम्यान पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारी नव्हते. कारोना विषाणूंचा प्रादुर्भाव होत असल्याने संसर्ग होण्याची सामान्य नागरिकांमध्ये भिती आहे. त्यामुळे थेट संपर्क टाळण्यात येत आहे. मात्र मृतदेह कोणीही सरसावत नसल्याने तेथे उपस्थित काही जण पुढे आले. सुरक्षा साधने नसतानाही त्यांनी मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आला.
.....................................
मृतदेह बराच वेळ उन्हात पडून होता. त्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून फोन केला. तसेच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला व पिंपरी पोलीस चौकीला देखील त्याबाबत सांगितले. बराच वेळ गेल्यानंतर रुग्णवाहिका व पोलीस आले. तोपर्यंत दोन तास मृतदेह तेथेच पडून होता. मृतदेहावर उन आल्याने काही जणांनी छत्री लावून त्यावर सावलीसाठी प्रयत्न केला. - डब्बू आसवाणी, स्थानिक............वृद्धाचा मृतदेह रस्त्यावर पडून असल्याची माहिती मिळाल्यानंतर चार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका आल्यानंतर लागलीच मृतदेह उचलण्यात आला. नागरिकांनी त्यासाठी मदत केली. त्यानंतर वायसीएम रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. वृध्दाचा मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.पुरुषोत्तम चाटे, पोलीस उपनिरीक्षक, पिंपरी पोलीस चौकी