पिंपरी : पाळीव तसेच भटक्या कुत्र्यांवर अत्याचाराचे प्रकार सुरूच आहेत. सांगवीतील सृष्टी चाैक परिसरात मंगळवारी (दि. ५) सकाळी सात कुत्रे मृतावस्थेत आढळून आले. सांगवीत सलग तीन दिवसांपासून उघडकीस आलेल्या घटनांमध्ये आतापर्यंत १९ कुत्र्यांचा जीव गेल्याचे समोर आले आहे. हे अमानुष कृत्य कोण करीत आहे, कुत्र्यांच्या जिवावर कोण उठले आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
सांगवी येथील स्ट्रे डाॅग्स फिडर या प्राणीप्रेमी ग्रुपकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भटक्या कुत्र्यांचा छळ करण्यात येत आहे. त्यांना खाद्यपदार्थांतून विषबाधा करण्यात येत आहे. त्यामुळे कुत्री दगावण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मंगळवारीही सकाळी साडेआठच्या सुमारास अशाच पद्धतीने सात कुत्री सृष्टी चाैकात मृतावस्थेत आढळून आले. याबाबत पोलिसांना माहिती देेेण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला.
दरम्यान, रविवारी दगावलेल्या कुत्र्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. विषबाधेमुळे कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचे अहवालात नमूद केले असून त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. जीवे मारण्याच्या हेतूने कुत्र्यांना खाद्यपदार्थांमधून विषबाधा केली जात आहे. यामागे कोण आहे, याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आरोपीचा शोध नाहीकुत्रे मृतावस्थेत आढळण्याचे प्रकार सुरूच असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सध्या रजेवर आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदभार असलेल्या अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान आहे. सलग तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र अद्याप आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.