पिंपरी : कर्करोग, कोरोनाला हरवून उच्चरक्तदाब, मधुमेह अशा दुर्धर आजारांचा यशस्वी सामना करणाऱ्या एका जिगरबाज पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे शहर पोलीस दलावर शोककळा पसरली. सांगवी येथे शुक्रवारी (दि. ८) दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
अविनाश विठ्ठल बोराटे (वय ४८), असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. बारोटे यांच्या मागे पत्नी रुपाली व मुलगा रसिक आहे. पदवीधर असलेल्या रुपाली या सांगवी येथील उरो रुग्णालयाच्या कर्मचारी आहेत. तर रसिक हा बारावी उत्तीर्ण झाला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून ते कार्यरत असताना त्यांची २१ डिसेंबर २०२० रोजी बदली होऊन ते २४ डिसेंबर रोजी हिंजवडी वाहतूक विभागात हजर झाले. त्यानंतर २ जानेवारी रोजी वैद्यकीय रजेवर गेले. घरीच उपचार घेत असताना शुक्रवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे रुग्णालयात जाण्यासाठी त्यांनी स्वत: फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेतली. ते रुग्णवाहिकेपर्यंत चालत गेले. त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सुरू झाला. सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
बारामती तालुक्यातील शिर्सूफळ हे मूळगाव असलेले बोराटे यांना वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून मधूमेह तसेच च्चरक्तदाबाचाही त्रास होता. त्यावर नियंत्रण मिळवत ते १९९३ मध्ये पोलीस दलात भरती झाले. त्यानंतर त्यांच्या पोटात गाठ असल्याचे निदर्शनास आले. २०१३ मध्ये पोटाच्या कर्करोगाचे (स्टमक कॅन्सर) निदान झाले. कर्करोगाची दोनदा शस्त्रक्रिया झाली. गेल्या वर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यावर त्यांनी यशस्वीपणे मात केली.
शरद पवार ‘ग्रॅण्ड आयडॉल’दुर्धर आजारांवर मात करण्याची प्रेरणा अनेक प्रख्यात व्यक्तींकडून घेता येते. अविनाश बोराटे देखील क्रिकेटपटू युवराज सिंग व फ्रान्स येथील जगज्जेता सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग वार्ड यांच्यापासून प्रेरित झाले होते. तसेच ग्रॅण्ड आयडॉल शरद पवार यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली होती. या तिघांनी दुर्धर आजारांवर मात करून यश संपादन केले. इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही संकटावर व आजारावर तुम्ही मात करू शकता, असे बोराटे सांगत असत.