लोणावळा: बॅकेमध्ये नोकरी करणार्या एका अंध महिलेची मुंबईतून लोणावळ्यात बदली झाली आहे. त्यांनी लोणावळ्यात आल्यानंतर स्वंपाकासाठी गॅस कनेक्शन घेण्याचा प्रयत्न केला मात्र गॅस एजन्सी धारकाने महिला अंध असल्याचे कारण देत गॅस कनेक्शन देणे नाकारले असल्याचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यात घडला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात उज्वल गॅस योजना सुरू केली. ज्यामुळे ग्रामीण भागासह गरीब कुटुंबातील महिलांना गॅस वापरता येईल. याचा प्रचार प्रसार सर्वत्र केला जात आहे. मात्र याच मोदींच्या योजनेला लोणावळ्यात मोडीत काढण्यात आले आहे. केवळ महिला अंध आहे म्हणून गॅस कनेक्शन नाकारण्यात आलं आहे. अंध असल्याने गॅस कनेक्शन देऊ शकत नाही असं थेट गॅस एजन्सी मालकाकडून सांगण्यात आले आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथील रहिवासी असलेल्या संगीता कोल्हापूरे यांची बदली नुकतीच ठाण्यातून लोणावळा येथे झाली आहे. त्यानंतर त्यांनी लोणावळ्यात एक खोली भाड्याने घेतली. जेवण बनविण्यासाठी त्यांना गॅसची आवश्यकता असल्याने त्यांनी लोणावळ्यातील परमार गॅस एजन्सी कडे नवीन गॅस कनेक्शन ची मागणी केली. परंतु परमार गॅस एजन्सी ने त्यांना कनेक्शन नाकारले. याबाबत त्यांनी विचारणा केली असता एजन्सी ने तुम्ही अंध असल्याने कनेक्शन देऊ शकत नाही असे सांगितले. तसे गॅस एजन्सी ने त्यांना लेखी लिहून देखील दिले आहे. मात्र अंध असले तरी पोटासाठी जेवण बनवावे लागत असल्याच्या भावना संगिता कोल्हापूरे यांनी व्यक्त केल्या. तर परमार गॅस एजन्सीचे मालक प्रकाश परमार म्हणाले, कंपनीचे काही नियम आहेत त्यानुसार आम्ही परवानगी नाकारली आहे. आम्ही त्यांची आडवणूक केलेली नाही. सदर महिला ह्या अंध आहेत भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार. मात्र त्यांचे अंडरटेकिंग घेऊन गॅस कनेक्शन देता येऊ शकेल का याबाबत कंपनीकडे विचारणा केली आहे. समाजात वावरताना अंध किंवा अपंग असले तरी त्यांना जगण्याचा अधिकार आहे. लोणावळ्यात अंध महिलेबरोबर घडलेला प्रकार हा निंदनीय असून याबाबत संबंधित गॅस एजन्सी मालकाला जाब विचारला जाईल असे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर व भाजपाच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले.