पिंपरी : काश्मीर फाईल्स चित्रपट पाहून आल्यानंतर 'ब्रेन स्ट्रोक' आलेल्या कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. २७) चिंचवड येथे घडली. अभिजित शशिकांत शिंदे (३८, रा. लिंकरोड, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अभिजित हा कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी मानणारा होता. अगदी लहानपणापासूनच त्याच्यावर हिंदुत्ववादी संघटनांचा प्रभाव होता. २१ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास अभिजित त्याच्या मित्रांसोबत काश्मीर फाईल्स चित्रपट पाहण्यासाठी गेला. चित्रपट पाहून आल्यानंतर मित्रांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. त्यानंतर तो कोणाशीही न बोलता थेट खोलीत झोपायला गेला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास अभिजितला ब्रेन स्ट्रोक आला.
मेंदूला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी फुटल्याने अभिजित बेशुद्ध पडला. सकाळी अभिजितच्या वडिलांनी खोलीत जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने अभिजितला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना रविवारी रात्री अभिजीतचा मृत्यू झाला. अभिजित हा अतिशय संवेदनशील होता. त्यामुळे अलीकडे अभिजित उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत होती, असे नातेवाईकांनी ''लोकमत''शी बोलताना सांगितले.
''चित्रपट पाहून आल्यानंतर अभिजितला ब्रेन स्ट्रोक आल्याने अनेकांनी याबाबत मला विचारणा केली. मात्र, मी चित्रपट चुकीचा आहे, असे म्हणणार नाही. कोणताही चित्रपट पाहताना तरुणांनी त्यातून चांगला बोध घेणे अपेक्षित आहे. संवेदनशील स्वभावाच्या व्यक्तींनी अशा प्रकारचे चित्रपट पाहताना खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे अभिजीतचे वडील शशिकांत शिंदे यांनी सांगितले.''