पिंपरी: आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरू असलेल्या बाळाचा ऑक्सिजन पुरवठा तिघांनी बंद केला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दोघेजण डॉक्टर आहेत. मंगळवारी रात्री सोमाटणे फाटा येथील जीवन हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे.
या प्रकरणी डॉ. रमेश सोनवणे, डॉ भूषण सोनवणे, हर्षल सोनवणे याच्यांवर गु्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणी दत्तात्रय एकनाथ वावरे (वय २८, रा. नायगाव, ता. मावळ) यांनी गुरुवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वावरे यांच्या बाळावर सोमाटणे फाटा येथील जीवन हॉस्पिटल मध्ये आयसीयू वॉर्डात उपचार सुरू होते. ते आणि त्यांच्या पत्नी आयसीयू वॉर्डच्या बाहेर बाकड्यावर बसले होते. त्यावेळी आरोपी तिघेजण हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी वावरे आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यांचे लहान बाळ आयसीयू वॉर्डमध्ये उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हे माहिती असताना देखील आरोपींनी आयसीयू बोर्डला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपचा कॉक बंद करून बाळाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.