पिंपरी : इमारत महापालिकेची त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असून तेथील महापालिका कार्यालयातील वीजचोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिका इमारतीतील वीजचोरी करून त्यावर खासगी वाहने चार्जिंग केली जात आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकच्या वतीने शहरातील विविध भागात इमारती तयार करण्यात आल्या आहेत. त्या भाड्यानेही देण्यात आलेल्या आहेत. पिंपरीतील महापालिका ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत इमारत आहे. तेथील तळमजल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पिंपरीतील इ आणि फ प्रभाग असे कार्यालय आहे. उर्वरित इमारतीत महापालिकेचे कर्मचारी आहेत. याठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी कुलरचे कनेक्शन आहे. तेथून काहीजण वीजचोरी करीत असल्याचे दिसून सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा दक्षता समितीचे सदस्य सागर चरण यांनी उघडकीस आणला आहे. कुलरसाठी असणाऱ्या प्लगमधून कनेक्शन घेऊन इलेक्ट्रीक गाडी चार्ज करीत आहेत.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
येथे येणारे नागरीक, तसेच काही कर्मचारी, अधिकारी आपली विद्युत वाहने महापालिकेच्या वीजमीटरवरून चोरी करून चार्जिंग करीत आहेत. अवैध वीज आणि विजेचा बेकायदेशीर वापर करीत आहेत. असेच प्रकार अनेक शासकीय कार्यालयात सुरू आहेत. कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून केल्या जाणाºया वीजचोरीकडे वरीष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली आहे.
महापालिकेने उभारलेल्या अनेक इमारती भाड्याने
महापालिकेने उभारलेल्या अनेक इमारती भाड्याने दिलेल्या आहेत. पिंपरीतील इमारतीत वीजचोरीचा प्रकार उघड झाला आहे. याबाबतचे पुरावे आयुक्तांना दिले आहेत. या घटनेची चौकशी करून दोषी आढळल्यास त्या कर्मचारी, अधिकारी यांच्यावर तत्काळ नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. न्याय हितासाठी सादर. -सागर रतन चरण, माजी सदस्य, जिल्हा दक्षता समिती.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे इलेक्ट्रिक बाईक नाहीत
संबंधित तक्रारीच्या अनुशंगाने तपासणी आणि पडताळणीच्या सूचना केल्या आहेत. तेथे महापालिकेचे कर्मचारी वीज चोरी करीत नाहीत. कारण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे इलेक्ट्रिक बाईक नाहीत. तेथील कनेक्शनबाबत विद्युत विभागास कळविले आहे. -शीतल वाकडे, प्रभाग अधिकारी