पिंपरी : दिवसाढवळ्या पिंपळे गुरव (pimpale gurav firing) येथे भर चौकात गोळीबार करून खून केल्याच्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यात स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी तीन राऊंड फायर केले. चाकण जवळील कुरळी गावात ही घटना घडली.
योगेश रवींद्र जगताप (वय ३६, रा. पिंपळे गुरव) यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. पिंपळे गुरव येथे १८ डिसेंबर रोजी सकाळी ही घटना घडली होती. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या मागावर पोलिसांची विविध पथके रवाना झाली होती. दरम्यान यातील आरोपी खेड तालुक्यात चाकण जवळील कुरळी गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथके कुळीत दाखल झाली. यावेळी आरोपींनी गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनीही आरोपींच्या दिशेने तीन राऊंड फायर केले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे देखील पोलिसांच्या या पथकासोबत होते, असे सांगितले जाते आहे. आरोपींनी केलेल्या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झाली नसून एका पोलिसाला किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.