पिंपरी : महापालिका हद्दीत बांधकाम राडारोडा टाकण्यासाठी ठिकाणे निश्चित करून देण्यात आली आहेत. मात्र, या निश्चित केलेल्या ठिकाणी त्या जागेच्या क्षमतेपेक्षा जास्त राडारोडा टाकला आहे. त्यामुळे नागरिकांना धूळीचा त्रास होत आहे. कचरा टाकला म्हणून नागरिकांना दंड करणाऱ्या महापालिकेला दंड कोण करणार असा सवाल स्थानिकांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात बांधकाम करताना व जुने बांधकाम पाडताना किंवा शासकीय संस्थाची विकासकामे करताना निर्माण होणारा राडारोडा टाकण्यासाठी प्राथमिक स्तरावर आठ प्रभागात ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. तसेच आवश्यकतेप्रमाणे यात वाढ करण्यात येणार होती. राडारोडयावर मोशी येथील प्लँटवर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीया करण्यात येणार असल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले होते.
राडारोड्याऐवजी प्लॅस्टिकच -
या ठिकाणी राडारोडा संकलित केला जाणार आहे. बांधकाम राडारोडयामध्ये कॉंक्रीट, माती, स्टील, लाकुड, विटा आणि रेतीमधील सिमेंट या बांधकाम साहित्याशिवाय इतर कचरा मिसळू नये असा आदेश आहे, मात्र, त्यात राडारोड्याऐवजी इतर कचराही टाकण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी असणारी झाडेही बुजली गेली आहेत.
ही आहेत राडारोडा टाकण्याची ठिकाणे-
अ प्रभागात निगडी पोलीस स्टेशन जवळ, ब प्रभागात मस्के वस्ती, रावेत, क प्रभागात कचरा संकलन केंद्र, गवळीमाथा, ड प्रभागात व्हिजन मॉलजवळ हायवे, वाकड, इ प्रभागात चऱ्होली स्मशानभूमी जवळ, फ प्रभागात अंकुश चौक स्पाईन रोड यमुनानगर, ग प्रभागात थेरगाव स्मशानभूमी जवळ तर ह प्रभागात दापोडी रेल्वे स्टेशन राडारोडा संकलित केला जातो.
शहरात राडारोडा टाकण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणाहून मोशी कचरा नेला जातो. रावेत येथील राडारोडा तातडीने कमी करण्याच्या सुचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता महापालिका
आमच्या शेजारी राडारोडा टाकण्याचे केंद्र उभारले आहे. मात्र, त्या ठिकाणचा कचरा वेळोवेळी उचलण्यात येत नाही. त्यामुळे आमच्या घरांमध्ये धूळ येत आहेत. त्यातून घशांचे आजारही होत आहे.- चेतना भोसले, गृहीणी
रावेत परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी दोनच महिन्यात राडारोड्याचा डोंगर उभा राहिला. तसेच या राडारोड्याच्या जवळच आरएमसी प्लॅट आहे. त्यामुळे रहिवाशांचा श्वास गुदमरत आहे.- अमोल कालेकर, रहिवाशी