पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी गेल्या नऊ वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले. तसेच स्वामीनाथन आयोग लागू करणे गरजेचे होते. शेतीमालाला भाव देण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे दुसऱ्यांनी काय केले हे विचारण्यापेक्षा स्वत: नऊ वर्षात काय केले हे पंतप्रधान मोदी यांनी दाखवावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. अंबादास दानवे हे शुक्रवारी (दि.२७) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यांनी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
अंबादास दानवे म्हणाले, वायसीएम मधील सोयी-सुविधा चांगल्या आहेत. काही सुधारणा सुचवल्या त्यावर काम करून त्याची माहिती देण्यासंदर्भात विचारणा केली आहे. महापालिकेकडून गरीब रूग्णांवर कमीत कमी पैशांत उपचार व्हावेत, ही आमचीच नाही. तर सर्वांचीच इच्छा आहे. लुबाडणूक होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
मराठा आंदोलकांपैकी मी एक आहे : दानवे
शहरात सकल मराठा समाजाकडून दानवे यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. त्यावर बोलतांना दानवे म्हणाले, मराठा समाजाकडून मला कसलाही विरोध नाही. मी एक मराठा आंदोलनातील एक आहे. मनोज जरांगे हे माझ्या मराठवाड्यातीलच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी सतत माझे बोलणे असते. आंदोलकांनी चर्चा करायला पाहिजे होती. मराठा समाज आक्रमक आता झाला आहे. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी जुनी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या भुमिकेत अवघा महाराष्ट्र आहे. केंद्र सरकारने मराठा समाजाविषयी आत्मीयता दाखवावी.