निगडी : येथील चौकात नाशिक बाह्यवळण रस्त्यावरील वाढत्या रहदारीमुळे पादचारी व वाहनचालंकाना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. या चौकात सिग्नल बसविण्याची जोरदार मागणी होत आहे. या चौकातून चाकण, तळवडे, भोसरी येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आसते. तसेच या औद्योगिक वसाहतीमध्ये मालवाहतूक करणारे कंटेनर, ट्रक कंपन्याच्या बसगाड्या, मोटारी आणि दुचाकी वाहनांची या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते. तसेच याच चौकातून मोठी लोकवस्ती असलेल्या रूपीनगर, साईनाथनगर, यमुनानगर या भागातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.या चौकात सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत ये-जा सुरू असते. मात्र, अंकुश चौकात वाहतूक नियंत्रक दिवे नसल्याने विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांसह जीव मुठीत धरून रस्ता ओलांडण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविल्यास विद्यार्थ्यांना व पालकांना रस्ता ओलांडताना सुरक्षितता लाभेल. सिग्नल नसल्याने वाहनचालकांना ताटकळत थांबावे लागते. भक्ती-शक्तीकडून चाकण, भोसरीकडे जाणारी अवजड वाहने स्पाईन रोडने भरधाव वेगात येतात; परंतु या चौकात कोणतेही गतिरोधक अस्तित्वात नसल्याने हा रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांची अनेकदा धांदल उडते. चौकात सिग्नल नसल्याने रस्ता ओलांडण्यासाठी वाट पहावी लागते. त्यात रिक्षाचालक रस्ता रिकामा होण्याची वाट न पाहता धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वेळा वादावादीचे प्रसंग घडले आहेत. याच चौकात मजूर अड्डा असल्याने गर्दीत भर पडत आहे. चौकातच दारू अड्डा असल्याने अनेक मद्यपी रस्त्यात झोकांड्या खात मध्येच उभे असतात. त्यामुळे अनेक वेळा वाहनचालकांचा गोंधळ उडतो. तसेच याच चौकात रस्त्याच्या मध्यभागी भारतरत्न डॉ़ बासाहेब आंबेडकर कमान आहे. ही कमान रस्त्याच्या बरोबर मध्यभागी असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांस अडथळा ठरत आहे. ही कमान फार जुनी व जीर्ण झाल्याने मोडकळीस आली आहे. एखाद्या भरधाव वाहनाचा धक्का लागल्यास मोठा अपघात होऊ शकतो. या कमानीचे नूतनीकरण करण्यासाठी व चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कार्येकर्त्यांनी अंदोलने केली. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे नेमीच कानाडोळा केला आहे. या आधी अंकुश चौकातील सिग्नल बसविणे व कमानीचे नूतनीकरण करण्यात यावे याबाबत लोकमतने बातमी प्रसिद्ध केली होती. संबंधित पालिका अधिकाऱ्याने सिग्नल बसविण्याची निविदा मंजूर झाली असून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. स्थायी समितीकडून हिरवा सिग्नल मिळताच लवकरात लवकर सिग्नल बसविण्यात येतील, असे अश्वासन दिले होते. पंरतु, चार महिन्याचा काळ उलटूनदेखील या चौकातील समस्येची कोणतीच दखल घेतलेली नाही. यावरून प्रशासन नागरिकांच्या जीवाशी किती दिवस खेळणार आहे, असा संतप्त सवाल सुज्ञ नागरिक करीत आहेत.(वार्ताहर)
सिग्नलची अद्याप प्रतीक्षाच!
By admin | Published: April 25, 2017 4:10 AM