पिंपरी : अरे...बघ, पोलीस आले...काय झालं? ...पळा.बघं ना... पोलीस ते सुद्धा स्टारवाले, मोठे अधिकारी कशासाठी आले?कायं तरी झालं असणार. त्याशिवाय एवढे पोलीस नाय येणार. काय तरी शॉट झालाय वाटतं.बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास महाविद्यालयाच्या आवारात पोलीस फौजफाटा पाहून विद्यार्थी थबकले. त्यांच्या तोंडून असे प्रश्न एकमेकांना विचारले गेले.पिंपरीतील एका महाविद्यालयाच्या आवारात पोलिसांचा फौजफाटा पाहून विद्यार्थ्यांची अक्षरश: धावपळ उडाली. पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी असे विविध उपक्रम पोलिसांनी हाती घेतले आहेत. महाविद्यालयाच्या आवारातील टवाळखोरांचा उपद्रव रोखण्यासाठी पिंपरीतील विविध महाविद्यालयांच्या ठिकाणी पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम राबवली. महाविद्यालयाच्या आवारात संशयास्पद वाटणाऱ्यांना पोलिसांनी हटकले. वाहनतळाजवळ थांबलेल्या विद्यार्थ्यांकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का, याची चौकशी केली. महाविद्यालयीन तरुण नसल्याचा संशय येताच ओळखपत्र दाखव असे म्हणत पोलीस एकेकाला थांबवत होते. विद्यार्थ्यांना हा काय प्रकार सुरू आहे, हे कळतच नव्हते. ते एकमेकांना ‘काय झालं रे?’ असे विचारत होते. एकाच वेळी मोठ्या संख्येने आलेल्या पोलिसांना पाहताच, अनेकांनी तेथून पळ काढला. महाविद्यालयात जाण्याऐवजी काहींनी थेट बाहेरचा रस्ता धरला.आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये रंगनाथ उंडे, अन्सार शेख, रामदास मुंढे, सागर पाटील, उत्कर्षा देशमुख या पोलीस अधिकाºयांसह अन्य पोलीस कर्मचाºयांचा सहभाग होता.विद्यार्थ्यांकडे नाहीत वाहनपरवानापोलीस पथकाने महाविद्यालयांजवळ टवाळखोरांचा उपद्रव रोखण्याची मोहीम राबवली. पिंपरीतील नवमहाराष्टÑ महाविद्यालय, तसेच चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाजवळ ही मोहीम राबविण्यात आली. विनाकारण महाविद्यालयाजवळ थांबलेल्या ४२ जणांना ताब्यात घेतले. ते विद्यार्थी नसल्याचे आढळून आल्यानंतर मुंबई पोलीस अधिनियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. समज देऊन त्यांना सोडले, तर दुचाकीवर आलेल्या विद्यार्थ्यांकडे वाहन परवाना नसल्याचे निदर्शनास आले. अशा ३८ वाहनांचे क्रमांक नोंदवून ते वाहतूक विभागाकडे चौकशीसाठी पाठविण्यात आले.
सिंघम पोलिसांची डरकाळी, विद्यार्थी धूम पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 1:08 AM