पिंपरी : माझ्या मुलीचा आताच अपघात झाला आहे, डिपॉझिट जमा केल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेत नाहीत. आमदार साहेब, ताईसाहेब, मॅडम तुम्ही तातडीने मोबाइलवर पेमेंट पाठवा ना, असे म्हणून ढसाढसा महिला रडू लागते. त्यामुळे भावनिक झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील एका नगरसेवकाने कोणताही खात्री न करता तातडीने मोबाइलवर गुगल पेद्वारे पैसे पाठविले. त्यानंतर फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. तोच फंडा वापरून पुण्यासह राज्यातील विविध चार महिला आमदारांना गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून, रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय मदत करताना शहानिशा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कर्करोग (कॅंसर), हृदय आणि किडनीशी संबंधित आजार आणि अपघाताच्या प्रसंगात उपचारासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यासाठी गरजूंच्या मदतीसाठी समाजातील काही दानशूर सरसावतात. त्यामुळे वेळेत उपचार होऊन रुग्णाला जीवदान मिळण्यास मदत होते. भावनिक प्रसंगामुळे अनेक व्यक्ती सढळ हाताने अर्थसाह्य करतात. त्यामुळे सायबर चोरट्यांनी याकडे मोर्चा वळविला आहे. वैद्यकीय मदत मागण्याच्या नावाखाली ऑनलाइन पैसे घेऊन फसवूणक होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.
...अशी होते फसवणूक
वैद्यकीय कारणास्तव मदत मागण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी किंवा व्यक्तीची माहिती घेतली जाते. त्याच्या परिसरातील रस्ते, चौक, रुग्णालय तसेच त्यांच्या ओळखीतील किंवा जवळच्या व्यक्तींबाबतही चोरटे माहिती घेतात. त्यानंतर फोन करून ढसाढसा रडून, गयावया करून उपचारासाठी पैशांची मागणी करतात. पैसे ऑनलाइन पाठविण्यास सांगतात. मदतीची ही रक्कम पाच, १० ते १५ हजारांपर्यंत असते. रक्कम कमी असल्याने संबंधित व्यक्ती जास्त खोलात न जाता पैसे देतात.
नगरसेवकांकडून घेतले पैसे
सांगवी येथील एका आरोपीने फोन करून तत्कालीन नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांना पैशांची मागणी केली. माझ्या मुलीचा अपघात झाला. तिच्या उपचारासाठी मदत करा, असे तो म्हणाला. त्यानुसार कांबळे यांनी पैसे दिले. तसेच शहरातील चार ते पाच नगरसेवकांनीही अशाच प्रकारे मदत म्हणून पैसे दिले. त्यानंतर कांबळे यांनी रुग्णालयात चौकशी केली असता, अशा प्रकारचा रुग्ण दाखल नसल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी २३ सप्टेंबर २०२१ रोजी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.