हिंजवडी : आयटी परिसरातील बेशिस्त वाहतुकीमुळे सर्वच हैराण झाले आहेत. आडमुठ्या वाहन चालकांमुळे प्रमुख मार्गावर होणारी दैनंदिन वाहतूक कोंडी आणि अपघातांना वाहनचालक वैतागले असून, वाहतूक पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावावी, अशी अपेक्षा आयटीयन्स व्यक्त करत आहेत. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळुराम नढे यांनी नुकतेच वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.हिंजवडी आयटी पार्कमध्ये नुकत्याच घडलेल्या अपघातामध्ये दोन तरुणींना नाहक जीव गमवावा लागला. प्रशासनाने आता तरी जागे होऊन, आयटीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित कशी करता येईल, याकडे लक्ष द्यावे. वाहतूक नियमांचे राजरोसपणे होणारे उल्लंघन, ट्राफीक सिग्नल तोडणे, विरूद्ध दिशेने वाहन चालवणे, अवजड वाहने ब्रेकडाऊन होणे, वाहनांचा सुसाट वेग आयटी परिसरात अपघातासह वाहतूक कोंडीत भर टाकत आहेत. वाहतूक कोंडी आणि अपघातांना निमंत्रण देणाऱ्या बेशिस्त वाहनचालक आणि ओव्हर स्पिडींगला लगाम घालावा. येथील वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी नियोजन समितीकडून दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अवजड वाहनांना वेळेची मर्यादा ठेवाहिंजवडी परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ हवे. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याबरोबरच, अवजड वाहनांना सकाळी ९:०० ते १२:०० आणि संध्याकाळी ५:०० ते ८:०० पर्यंत आयटीतील गर्दीच्या प्रमुख मार्गावर प्रतिबंध करावा, त्यांची वेळोवेळी तपासणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
आयटीतील वाहतुकीला शिस्त लावावी. वाहतूककोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करावी. अवजड वाहनांना प्रमुख मार्गावर वेळेची मर्यादा ठरवून द्यावी, फिटनेस तपासणी करावी, वाहतूक उपाययोजना कराव्यात. - काळुराम नढे, सदस्य, जिल्हा नियोजन समिती