पिंपरी : रात्रीच्या अंधारात खड्डा खोदून कोणीतरी पुरला आहे, असे एकाच्या निदर्शनास आले. त्याने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खड्डा खोदला त्यावेळी मृतदेहाऐवजी मेलेले मांजर निघाले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
शहरात रविवारी (दि. २८) होळीची धामधूम सुरू असतानाच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दुपारी बाराच्या सुमारास एक कॉल आला. साहेब मी पांजरपोळ, भोसरी येथून बोलतोय. आमच्या इकडं रात्रीच्या अंधारात कोणीतरी मृतदेह पुरला आहे. तुम्ही लवकर या, असे फोन करणा-या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे एका ठिकाणी जमीन खोदलेली दिसली. तेथे हळदी-कुंकू गुलाल, तांदूळ, चिरमुरे टाकून तेथे अगरबत्ती लावली असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे कोणीतरी मृतदेह पुरला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
पुरलेला मृतदेह उकरून काढायचा असल्याने पंच म्हणून तहसीलदार व शासकीय कर्मचारी तसेच डॉक्टर यांच्या उपस्थितीत खोदकाम सुरू केले. दरम्यान घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. काही फूट खोदल्यानंतर एक मेलेले मांजर पुरले असल्याचे आढळून आले.