पिंपरी : केवळ चोरी करणारे नव्हे तर चोरीचा माल असलेल्या दुचाकी खरेदी करणाऱ्यांवरही पिंपरी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याशिवाय दुचाकी चोरी करणाऱ्या सात आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून सुमारे सहा लाख ८० हजार रूपये किंमतीच्या २२ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याबाबत परिमंडल तीन पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांनी माहिती दिली.कागदपत्रे किंवा नंबर नसलेली चोरीची दुचाकी घेणाऱ्या सहा जणांवर चोरीचा माल घेतल्याप्रकरणी कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष श्रीमंत लांडे (वय १९), अमोल रमेश गिरी (वय १९), योगेश बाळकृष्ण शेंडगे (वय १८, तिघे रा. सणसवाडी, ता. शिरुर, जि. पुणे), गणेश सुनील बोरकर (वय २४, रा.आळंदीरोड, भोसरी), विवेक सुभाष साबळे (वय २६), अतुल मारुती बोरकर (वय २३), शंकर लक्ष्मण काळे (वय ३१, तिघे रा. सायगाव, ता. खेड, जि. पुणे) अशी चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ११ स्प्लेंडर, २ पॅशन, २ सीडी डीलक्स, १ पल्सर, ४ होंडा शाईन आणि २ युनिकॉर्न अशा एकूण २२ ुदचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी शंकर काळे या आरोपीकडून ५ लाख १० हजार रुपये किंमतीच्या १७ टू व्हीलर जप्त करण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांपुर्वी भोसरी पोलिसांनी अशीच कामगिरी केली होती. त्या कारवाईत चोरट्यांकडून १८ दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, सहायक पोलीस फौजदार रघुनाथ तापकीर, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण, संदिप गवारी, विपुल जाधव, दीपक साबळे, किरण जाधव, नितीन खेसे, विजय तेलेवार यांनी ही कारवाई केली.