पिंपरी : उद्योगनगरीत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत सहा हजार १४९ गर्भपात झाल्याची नोंद आहे. आधुनिक काळात माणसाच्या जीवनशैैलीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. स्त्रिया नोकरी व व्यवसायामध्ये पुढे पाऊल टाकत आहेत. त्यामुळे अनेक दाम्पत्य ‘इतक्यात मूल नको’ असा विचार करतात. अचानक गर्भधारणा झाली तर कायद्यानुसार दोघांच्याही संमतीने गर्भपात केला जातो. मात्र, वाढत्या गर्भपाताचा स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.‘नको असलेली गर्भधारणा’ या कायद्यांतर्गत मान्यता असलेल्या डॉक्टरांकडून गर्भपात करून घेतात. मुळातच गर्भपात ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. रोजच्या धकाधकीमुळे बहुतांशवेळा नैसर्गिकपणेही गर्भपात होतो. सरकारमान्य गर्भपात केंद्रामध्ये गर्भपात करणे सुरक्षित असते. मात्र, सामाजिक भीतीपोटी अनेक जणी असुरक्षितपणे गर्भपात करतात. अनेक स्त्रिया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर गर्भपाताच्या गोळ्या घेतात. याचा स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.गरोदरपणाच्या कालावधीमध्ये गर्भाची वाढ होत असताना काही गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. तेव्हा गर्भपात करण्याची वेळ गरोदर स्त्रियांवर येते. खरे तर गर्भपातामध्ये जरासाही हलगर्जीपणा केला, तर त्याचे अनेक गंभीर परिणाम स्त्रियांना भोगावे लागतात.गर्भपात करताना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेता तसेच अपुऱ्या साधनसामग्रीच्या आधारावर केले जाणारे गर्भपात हे महिलांच्या जिवाला हानिकारक ठरू शकतात. गर्भपात झाल्यानंतर काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अतिरक्तस्राव, जास्त ताप, पोटात वेदना होत असतील, तर त्वरित उपचार घेणे आवश्यक असल्याचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंगल सुपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये गरोदरपणा ही एक आनंददायी घटना आहे. मात्र काही वेळा अपरिहार्य कारणांमुळे गर्भपात करून घेण्याची वेळ येते. यामुळे स्त्रीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर धोकादायक परिणाम होतात. नको असलेला गरोदरपणा टाळण्यासाठी स्त्री व पुरुष दोघांसाठीही तात्पुरती व कायमस्वरूपी गर्भनिरोधक साधने उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे शासकीय रुग्णालय दवाखान्यांमध्ये ही साधने मोफत उपलब्ध आहेत.समाजामध्ये या साधनांचा वापर करण्याबाबत जागरूकता निर्माण होणे महत्त्वाचे आहे. गर्भपातामुळे स्त्रीच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम नक्कीच टाळता येतील. स्त्रियांना गर्भपाताची सुरक्षित सेवा मिळणे आणि त्यासंबंधी समाजात जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण होणे आवश्यक आहे, असे तालेरा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वीणादेवी गंभीर यांनी सांगितले.
उद्योगनगरीत सहा महिन्यांत सहा हजार गर्भपात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 1:50 AM