पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यास ६ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. दत्तू नामदेव शिंदे (वय ३८, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. आर. एच. मोहम्मद यांनी हा आदेश दिला आहे. राजेंद्र भरतू चरण (वय ४२, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी लक्ष्मी चरण (वय ३८) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. १ आॅक्टोबर २००९ रोजी पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयाजवळील स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला होता. शिंदे व चरण कुटुंबीय एकाच कॉलनीत शेजारी राहतात. त्यांच्यात किरकोळ कारणांवरून नेहमीच वाद होत होते. दत्तूची व आरोपीची पत्नी छाया शिंदे या नळावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी लक्ष्मी चरण यांनी भिंतीवर वाळत घातलेल्या साडीतून नळावरील बादलीत पाण्याचे काही थेंब पडले. यावरून दोघींमध्ये वाद सुरू झाला. या वेळी फिर्यादी व राजेंद्र शिंदे त्यांना समजावत होते. मात्र, रागावलेल्या दत्तूने राजेंद्र यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या तोंडावर जोरजोरात लाथा मारल्या. यातच ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच दि. ४ आॅक्टोबर २००९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. मारहाण झाल्यानंतर आरोपीवर भादवि ३०७ (खुनाचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, राजेंद्र यांचा मृत्यू झाल्यानंतर कलम ३०२ (खून) लावण्यात आले. मात्र, न्यायालयाने ३०४ (२) हे सदोष मनुष्यवधाचे कलम लावून दत्तू दोषी ठरवून ६ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. संदीप वाघ यांनी १२ साक्षीदार तपासले. (प्रतिनिधी)
सहा वर्षांची सक्तमजुरी
By admin | Published: September 01, 2015 4:04 AM