लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळे गुरव : राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील निगडी-देहूरोडदरम्यानच्या रस्ता रुंदीकरणावेळी अडथळा ठरत असलेल्या वृक्ष महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाने हटविण्यास सुरूवात केली आहे. त्याविरोधात मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने हरित लवाद न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. दि. २५ मे रोजी न्यायालयात दाव्याची सुनावणी झाली. त्या वेळी रस्ते विकास महामंडळाकडून न्यायालयाला दिलेल्या झाडाच्या आकडेवारीची तफावत व महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन १९७५च्या कायद्यातील तरतुदीनुसार परवानगी नसताना केवळ अॅडमिनिस्ट्रेशन कमांडन्ट स्टेशनक्वार्टस देहूरोड यांनी दिलेल्या नाहारकत दाखल्यावरून सदर ठिकाणी वृक्षतोड केली आहे़ ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर न्यायालयाने अॅडमिनिस्ट्रेशन कमांडन्ट स्टेशन क्वार्टस देहूरोड यांच्या ना हरकत दाखल्याविरोधात त्यांच्या आपिलेट अधिकारी यांच्याकडे आपिल करण्याचे निर्देश दिले, असे असताना रस्ते विकास महामंडळाकडून दि. ३० मे रोजी भक्ती-शक्ती चौकाच्या पुढील बाजूचे झाडे तोडण्यात आली. याबाबत निवासी जिल्हाधिकारी यांना फोनवरून माहिती असता त्यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलून कारवाईबाबत कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहेत. न्यायालयात दावा प्रलंबित असताना आज केलेल्या वृक्षतोड विरोधात पोलीस एफआयआर दाखल करण्याचे आदेश जिल्हाअधिकारी यांनी द्यावेत अशी मागणी संस्था करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, अण्णा जोगदंड, अॅड. रूपाली वाईकर, जावेद शेख, मुरलीधर दळवी, विकास शाहाने, अरुण मुसळे यांनी सांगितले.अडथळा ठरणारी झाडे तोडण्यास परवानगीदेहूरोड : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील देहूरोड ते निगडीदरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण कामात अडथळा ठरणारी ९९ झाडे तोडण्यास परवानगी मिळाली असून, त्यानुसार निगडीतील लष्करी पाणीपुरवठा केंद्र (एमईएस पंप हाऊस) व देहूरोड कॅन्टोन्मेन्टच्या जकात नाका भागातील झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. देहूरोड कॅन्टोन्मेन्ट हद्दीत निगडी ते देहूरोड दरम्यानच्या महामार्गालगत असणारी झाडे चौपदरीकरणात अडथळा ठरत आहेत. त्याविषयी महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे म्हणाले, ‘‘महामार्गाचे प्रत्यक्ष रुंदीकरण करताना अडथळा ठरणारी एकूण ९९ झाडे तोडण्याबाबत आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार झाडे तोडण्यास ठेकेदारामार्फत सुरुवात करण्यात आली आहे.’’
लवादाचा दावा प्रलंबित असताना ‘महामंडळा’कडून झाडांची कत्तल
By admin | Published: May 31, 2017 2:29 AM