पिंपरी : निवडणुकीमध्ये प्रचाराचे स्लोगन खूपच महत्त्वाचे असते. अगदी नेमक्या शब्दांमध्ये मतदारांना पटणारे स्लोगन, प्रचारासाठीची पत्रके, भाषणं यामधील मजकूर तयार करून देणाऱ्यांना सध्या मोठी मागणी आहे. मतदारांपर्यंत उमेदवाराची माहिती, चिन्ह पोहोचविण्यासाठी हा मजकूर लिहून देणाऱ्यांचा (कंटेन्ट राइटर) यांचा भाव वधारला आहे.महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था, पीआर एजन्सी कार्यरत आहेत. प्रचारासाठी तरुण मुले-मुली उपलब्ध करून देण्यापासून ते त्या उमेदवाराचे ब्रँडिंग करण्यापर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा त्यांच्याकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत.उमेदवारी अर्ज भरणे, माघारी आणि त्यानंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवार आता झोकून देऊन प्रचाराला लागले आहेत. छोट्या छोट्या प्रचारसभा व पदयात्रांना आता सुरूवात झाली आहे. काही संस्थांकडून प्रचारांच्या भाषणांसाठी उमेदवारांना मुद्दे तयार करून दिले जातात. उमेदवारांबरोबर राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनीही कोणत्या मुद्द्यांवर भर द्यावा, यासाठी या संस्थांची मदत घेतली जात आहे. पदयात्रा व प्रचार सभांबरोबर सोशल मीडिया हे देखील प्रचाराचे मोठे साधन बनले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आदी माध्यमांवर जोक, विरोधाभास दर्शविणारी विधाने टाकून पक्षाचा तसेच उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारा मजकूरही संस्थांकडून उपलब्ध आहे.जाहीरात तयार करणाऱ्या संस्थांकडून जाहिरातींसाठी आकर्षक स्लोगन तयार करून दिली जातात, पूर्वी राजकीय जाहिरातींसाठीही याच संस्थांची मदत घेतली जायची. मात्र आता शहराच्या राजकारणाची चांगली माहिती असलेल्या व्यक्तींची मदत यासाठी घेतली जात आहे. विरोधकांना नेमक्या कोणत्या मुद्द्यावर खिंडीत पकडायचे याचा अभ्यास करून त्यानुसार कृती केली जात आहे, अशी माहिती प्रवीण पगारे यांनी दिली. (प्रतिनिधी)
स्लोगन तयार करणाऱ्यांचा भाव वधारला
By admin | Published: February 13, 2017 1:50 AM