तळवडे : येथील सॉफ्टवेअर पार्क चौकात एम आय.डी.सी. च्या वतीने प्रवेशद्वार बनविण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी खोदकाम केल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. काम संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी प्रवासी करीत आहेत. या ठिकाणी वाहनांची वाढती वर्दळ, भविष्यात रस्त्यात होणाऱ्या बदलांचा विचार न करता सिमेंट काँक्रीटचे प्रवेशद्वार उभारले जात असल्याने प्रवेशद्वाराचे काम बंद करण्याची मागणी होत आहे.सॉफ्टवेअर चौकातील रस्त्यावर आणि दोन्ही बाजूंच्या पदपथावर खड्डे खोदण्यात आले आहेत. सुमारे तीन आठवड्यांपूर्वी या ठिकाणी खोदकाम केले आहे. त्यातील मुरुम रस्त्यावर टाकला आहे. काम सुरु असल्याची कल्पना वाहनचालक व प्रवाशांना यावी म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचे फलक लावले आहेत.परंतु सुरक्षेच्या दृष्टीने ते पुरेसे नाहीत. तसेच खड्डे खोदलेल्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास अंधार असल्याने नवख्या वाहनचालकाच्या लक्षात येत नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पादचारी मार्ग खोदला; परंतु पादचाºयांसाठी अजूनही पर्यायी सोय केलेली नाही. कामाबाबत नियोजनाचा अभाव आहे. तसेच या परिसरातील वाहतुकीचे नियोजन करण्याचा विचारही एम.आय.डी.सी. च्या वतीने करण्यात आला नाही, अशा तक्रारी वाहनचालक आणि स्थानिक नागरिक करीत आहेत.तळवडे सॉफ्टवेअर चौकात एम.आय.डी.सी. च्या वतीने प्रवेशद्वाराचे काम सुरु केले आहे. याबाबत एम.आय.डी.सी. च्या अधिकाºयांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन यांच्याशी विचारविनिमय करणे गरजेचे होते. येथे वाहनांची प्रचंड वर्दळ आहे. सतत होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी या परिसरात उड्डाणपूल किंवा ग्रेड सेपरेटर उभारणे गरजेचे होणार आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर होणारा खर्च वाया जाणार आहे. भविष्याचा विचार करुन प्रवेशद्वाराचे काम थांबवावे याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा केली आहे.- पंकज भालेकर, नगरसेवकतळवडे येथील सॉफ्टवेअर पार्क परिसरात प्रवेशद्वाराच्या कामाचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आला आहे. सुरक्षेविषयी, कामाचे नियोजन द्यावे, याबाबत तसेच काम उशिरा चालू केल्याबाबत वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. यापुढेही काम करताना वाहतुकीचा विचार करून काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. कामात कुचराई केली किंवा काही दुर्घटना झाल्यास संबंधित ठेकेदारास जबाबदार धरण्यात येईल. याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराकडे पाठपुरावा करीत आहे.- प्रताप शिंदे, उपअभियंता, अभियंता, एम.आय.डी.सी
तळवडे सॉफ्टवेअर पार्क प्रवेशद्वाराचे काम संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 2:27 AM