चाकण : नोटाबंदीला जवळपास दीड महिना होत असून शेतकरी, जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आदी सर्वसामान्य माणसांच्या आर्थिक जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे, तर आशिया खंडातील सर्वांत मोठी असलेली चाकण औद्योगिक वसाहत शांत दिसत आहे. नोटाबंदीमुळे औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट अधिक गडद झाले असून उद्योजकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. बहुतांश कंपन्यांनी कामगारांना मागील दोन-तीन दिवसांपासून ३१ डिसेंबरपर्यंत सुट्ट्या दिल्या आहेत.चालू दसरा - दिवाळी सणाच्या मुहूर्तावर मार्केटने चांगला उठाव घेतल्यानंतर सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र १००० व ५०० च्या नोटा बंदीनंतर औद्योगिक क्षेत्र पूर्णत: कोलमडले आहे. आता हे मंदीचे सावट कधी दूर होणार याची वाट पाहण्याशिवाय पार्याय राहिला नाही. कामगार कपातीपासून ते अनावश्यक खर्चावर उद्योजकांनी बंधन घातले आहे. कामगारांच्या पगाराची चिंता उद्योजकांना भेडसावत आहे.नोटबंदी नंतर मोठ्या कंपन्यांसह लघु उद्योग, व्हेंडर्स, कच्चा माल पुरवठादार, वर्कशॉप, ट्रान्सपोर्ट, केटरर्स, मनुष्यबळ पुरवठादार, छोट्या उद्योजकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. वेअरहाऊस भाड्याने घेऊन छोटे उद्योग चालविणारे उद्योजक कसेबसे भाडे व कामगारांचे पगार करून दिवस पुढे ढकलीत आहेत. 'आधीच मंदी अन त्यात नोटाबंदी' त्यामुळे कंपन्यांना नवीन कामांच्या आॅर्डर्स नाहीत. त्यामुळे ५० टक्के पेक्षा जास्त उद्योग ठप्प झाले आहेत. अनेक कंपन्यांना ठरल्याप्रमाणे कामगारांना काम असले नसले तरी पगार द्यावा लागत आहे. नियमित काम नसले तरी कंपनीच्या शॉप फ्लोअरवर व आवारातील इतर कामेही करावी लागत आहे. मासिक वेतन देताना नोटांची समस्या भेडसावत असून आता कामगारांना धनादेशाने अथवा आरटीजीएसने पगार करावा लागत आहे. परंतु कागदपत्रांच्या अभावामुळे परप्रांतीय कामगारांची बँकेत खाती नसल्याने पगार करताना अडचणी होत आहेत. घर, दुचाकी, चारचाकी मोटार, फर्निचर आदींसाठी घेतलेले कर्ज चलन तुटवड्यामुळे थकीत झाले असून कामगारांना हप्ते भरण्यासाठी कॅश उपलब्ध होत नसल्याने कामगार त्रस्त आहेत. कजार्चे हप्ते थकल्याने बँकाही वसुली साठी मागे लागल्या आहेत. कच्चा व पक्का माल पुरवणा?्या व्हेंडर्सला देण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याने अनेक कंपन्यांनी मालाचा पुरवठा बंद केला असून छोट्या कंपन्या व लघु उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणा-या छोटे उद्योजक व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.चाकण औद्योगिक वसाहतीतील नोटाबंदीमुळे हतबल झालेल्या कंपन्यांना या मंदीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कामगार कपातीशिवाय पर्याय राहिला नाही. तसेच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यात आलेले आहे. व्यवस्थापनाने काही निर्णय लांबणीवर टाकले आहेत. एकूणच खेड तालुक्यातील जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार थंडावले असून औद्योगिक वसाहतीतील नवीन भूखंडांची खरेदी-विक्री, त्यावरील बांधकाम अथवा विस्तारीकरण थांबविण्यात आले असून हि कामे पुढे ढकलण्यात आली आहेत.बजाज आॅटो, महिंद्रा, फोक्सवॅगन, मर्सिडीज, ह्युंदाई, लॉरियल, लुमॅक्स, ब्रिजस्टोन, टेट्रा पॅक, कॉर्निंग इंडिया, कल्याणी, भारत फोर्ज, गॅब्रियल, स्पायसर, रेकॉल्ड, मिंडा ग्रुप, केहिनफाय, बडवे आॅटो, रिंडर इंडिया सारख्या नामांकित कंपन्यांनी उत्पादन कमी केले असून काही कंपन्यांनी कामगार कपात केली आहे. नोटबंदीमुळे रोजंदारीवर काम करणा-्या कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली असून कायमस्वरुपी कामगारांचे पगार कसे करायचे याचा विचार व्यवस्थापन करीत आहे. उत्पादन केलेल्या मालाचे काय करायचे व किती साठा करायचा हा प्रश्न कंपन्यांपुढे उभा राहिला आहे. एकूणच नोटाबंदी झाल्याने चाकण औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट पसरले असून कमी भांडवलावर उभे राहिलेले छोटे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. (वार्ताहर)
चाकण औद्योगिक क्षेत्रात मंदीची लाट
By admin | Published: December 22, 2016 11:55 PM